सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. रील्स आणि शॉर्ट व्हीडिओंना लोक पसंत करतात. सोशल मीडियावर हे रील्स स्कोर करायला लागलो की यात किती वेळ जातो याचा वापरकर्त्याला अंदाज येत नाही. तरूणाई तासनतास हे रील्स बघत असते. या रील्समध्ये नेटकऱ्यांचा खूप वेळ जातो. रील्स बघण्याच्या नादात अनेकदा महत्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होतं. कामाच्या ठिकाणी देखील लोक रील्स बघत असतात. त्याचा कामावर परिणाम होऊ शकतो. याबाबत मुंबईतील नामांकित हॉस्पिटलने नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबईतील कामा या सरकारी हॉस्पिटलने रील्स बघण्यावर बंदी घातली आहे आणि जर या नियमाचं उल्लंघन केलं तर संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सोशल मीडियाचा वापर कमी करण्यासाठी मुंबईतील नामांकित हॉस्पिटलने त्यांच्या नियमावलीत बदल केला आहे. कामा हॉस्पिटलमध्ये रील्स बघण्यावर आणि मोबाईलच्या अतिवापरावर बंदी घालण्यात आली आहे. रील्स बघण्याचे व्यसन अनेकांना जडले आहे. शासकीय कार्यालयात काही कर्मचारीही हे रील्स पाहण्यात व्यस्त असतात. त्याला आळा घालण्यासाठी कामा रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षारक्षक यांनी ऑनड्युटी असताना मोबाइलचा गैरवापर टाळावा. तसेच रील्स बनवू नयेत आणि बघूही नयेत म्हणून कामा रूग्णालयाने असा फतवा काढला आहे.
रुग्णालयात मोबाइलचा वापर हा शासकीय कामासाठीच करावा. तसंच शासकीय कामकाजासाठी संदेश पाठविण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अॅपचा वापर करावा. जेणेकरून ऑडिओ-व्हिडीओ क्लिप, फाइल्स आदी माहितीची सुरक्षित देवाण-घेवाण होईल, असं कामा हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
हॉस्पिटलमध्ये शिस्त राहावी. आलेल्या रूग्णांचे हाल होऊ नयेत. त्यांच्यावर लवकरात लवकरत उपचार व्हावेत. यासाठी कामा हॉस्पिटल प्रशासनाने नवी नियमावली तयार केली आहे. यात हॉस्पिटल परिसरात रील्स बनवण्यावर तसंच इंटरनेटवर रील्स बघण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी या नियमांचं पालन करायचं आहे. जर हे नियम पाळले गेले नाहीत तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. जे कर्मचारी कामावर असताना मोबाइलचा गैरवापर करतील त्यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.