मुंबई : आगीच्या घटनांची मालिका मुंबईत सुरुच आहे. चेंबुरमधील टिळकनगरच्या सरगम इमारतीच्या 14 व्या मजल्यावर लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झालाय. तर एक जण जखमी झालाय. सुनिता जोशी (वय 72 वर्षे), भालचंद्र जोशी (वय 72 वर्षे), सुमन श्रीनिवास जोशी (वय 83 वर्षे) आणि इतर दोन जणांचा मृतांमध्ये समावेश आहे.
संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान इमारत क्रमांक 35 च्या 14 व्या मजल्यावर आग लागली. या घरातील लोक घाबरून बाहेर पळाले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयन्त केला.
रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या असल्याने अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास अनेक अडचणी आल्या. तसेच इमारतीमध्ये कार पार्क केल्याने अग्निशामक दलाला घटनास्थळी पोहोचण्यास बराच वेळ गेला. अग्निशमन दल अकराव्या मजल्यावर पोहोचले. या आगीत काही जण अडकले होते, तर काही जण इमारतीच्या टेरेसवर जीव वाचवण्यासाठी गेले होते.
या सर्वांना अग्नीशमन दलाने सर्वांना सुरक्षित ठिकाणी आणलं आणि सुटका केली. पण गुदमरून पाच जणांचा मृत्यू झालाय. जखमीवर सध्या उपचार सुरु आहेत.
मुंबईत राहणारे नागरिक खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न सातत्याने उपलब्ध होतोय. मुंबईतील आगीच्या घटनांची मालिका सुरुच आहे आणि यामध्ये अनेकांचा जीव जातोय. इमारतीमध्ये अग्नीरोधक उपायांची कमतरता, खबरदारी न घेणे, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी नीट रस्ता नसणे अशा अनेक कारणांमुळे जीव जात आहेत.