मुंबई : देशभरात मकरसंक्रांतीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना मुंबईत गालबोट लागलं. कापलेली पतंग पकडताना तबेल्यात गेलेल्या दहा वर्षांच्या चिमुरड्याचा शेणाच्या दलदलीत बुडून मृत्यू झाला. ऐन संक्रांतीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Mumbai Child dies drowning after attempt to catch Kite)
घराच्या छतांवर उभे राहून अनेक जण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. एकमेकांच्या पतंगांची काटाकाटी करताना चढाओढही पाहायला मिळते. कापलेल्या पतंगी गोळा करण्यासाठी धावाधाव करणारी लहान मुलं पाहायला मिळतात. मुंबईतील कांदिवली भागातही अशाच प्रकारे काही चिमुरडे कापलेली पतंग पकडण्याचा प्रयत्न करत होते.
पतंगाचा पाठलाग करताना चिमुरडा तबेल्यात
कांदिवली पश्चिमेला राहणारा दहा वर्षांचा दुर्गेश जाधव दुपारी मित्रांसोबत पतंग उडवत होता. दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास पतंग पकडता पकडता तो डहाणूकरवाडीतील एका तबेल्याजवळ गेला. ज्या पतंगाचा पाठलाग करत तो आला, ती तबेल्यातील शेणाच्या दलदलीत अडकली होती.
शेणाच्या दलदलीत पाय अडकल्याने घात
दुर्गेश पतंग उचलण्यासाठी दलदलीत शिरला, मात्र त्याचा पाय अडकला आणि शेणाच्या दलदलीत तो बुडू लागला. अखेर दलदलीत बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळी दाखल झालेले पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मशिनच्या सहाय्याने दुर्गेशचा मृतदेह दलदलीबाहेर काढला. (Mumbai Child dies drowning after attempt to catch Kite)
दुर्गेशच्या मृत्यूला जबाबदार कोण?
कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मात्र दुर्गेशच्या मृत्यूला कोणाची हलगर्जी कारणीभूत आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. शेणाच्या दलदलीच्या एका बाजूला तबेला, तर दुसऱ्या बाजूला बिल्डरचा प्रोजेक्ट असल्याने या घटनेला कोणाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, याचा शोध पोलीस घेत आहेत. पूर्ण तपास करुन दोषींविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचं कांदिवली पोलिसांनी सांगितलं.
मांजामुळे गळा चिरुन मृत्यू
मकरसंक्रांतीच्या काळात मांजामुळे गळा चिरुन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. नायलॉन मांजामुळे गळा चिरुन काही दिवसांपूर्वी नाशिकमधील महिलेचा मृत्यू झाला होता. दुचाकीवरुन घरी जात असताना भारती जाधव यांचा मृत्यू झाला होता.
संबंधित बातम्या :
नायलॉन मांजामुळे गळा चिरुन महिलेचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार
(Mumbai Child dies drowning after attempt to catch Kite)