Mumbai Water Cut : मुंबई शहर आणि उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत आज आणि उद्या दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दोन दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यत: वैतरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र वैतरणा जलवाहिनीवरील यंत्रणेमध्ये ताराळी (जिल्हा ठाणे) येथे 900 मिलीमीटर झडपेमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ही जलवाहिनी यंत्रणा अंशतः बंद करण्यात आली आहे.
वैतरणा जलवाहिनीच्या झडपेमधील बिघाडामुळे भांडुपमधील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये 5 ते 10 टक्के घट झाली आहे. यामुळे संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरूवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 ते शुक्रवार 18 ऑक्टोबर 2024 या दोन दिवसांसाठी पाणीकपात केली जाणार आहे. ही पाणी कपात संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरात 5 ते 10 टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस पाणी जपून वापरावे, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे.
वैतरणा जलवाहिनीच्या 900 मिलीमीटर झडपेमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी साधारण 48 तास लागणार आहेत. दुरुस्ती करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र याला साधारण दोन दिवस लागणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका क्षेत्रात आज आणि उद्या दोन दिवस 5 ते 10 टक्के पाणीकपात केली जाणार आहे. या दरम्यान नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.