मुंबई | 11 जानेवारी 2024 : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा काल निकाल लागला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी या निकालाचं स्वागत केलं. तसंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाबाबत मोठं विधान केलं. त्यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहेत. विधानसभा अध्यक्षावर ठाकरे गटाचा दबाव असल्याचं एकनाथ शिंदे म्हणालेत. ते लोक शिवसेना पक्षाला प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वापरत होते. परंतु असं करू शकत नाही. म्हणून हा मोठा झटका त्यांना मिळालेला आहे. हुकूमशाही पद्धतीने पार्टी चालवणाऱ्या लोकांना हा मोठा झटका देण्यात आलेला आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
भरत गोगावले यांची याचिका पूर्णपणे कॅन्सल केलेली आहे. यामध्ये कोणता दबाव अध्यक्षांवरती होता का? हे देखील समोर यायला हवं. आम्ही लवकरच सोबत बसून बोलू आणि नंतर निर्णय घेऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशीरा माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी हे विधान केलं.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा प्रभू श्रीरामांनी दिलेला आशीर्वाद आहे. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्या आधी या ठिकाणी निर्णय मिळाला. सर्व जनतेला न्याय मिळाला. आजचा निर्णय हा आपल्या सगळ्यांचा आहे. हे लोक आधीपासून वेगवेगळी विधानं करत होते. मुख्यमंत्री आज जाणार, परवा जाणार असं सारखं बोलत होते. परंतु मी अजूनपर्यंत कायम आहे, असंही शिंदे म्हणाले.
आजचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे. आजचा जो निर्णय झालेला आहे तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे. पक्ष लोकशाही पद्धतीने चालवला पाहिजे, अशा प्रकारचा संदेश आजच्या या निकालातून मिळालेला आहे. या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.
आगामी लोकसभा निवडणूक आणि महायुतीचं जागावाटप यावरही शिंदेंनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीमध्ये 45 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या जिंकून येणार आहे, असंही शिंदे म्हणाले.