मुंबई | 14 जानेवारी 2024 : मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसला रामराम केल्यानंतर मिलिंद देवरा आज दुपारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरा जर शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबईत एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मिलिंद देवरा आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते पक्षप्रवेश करतायेत का? मीही हे ऐकतो आहे. अद्याप मला याबाबत काही माहिती नाही. पण जर शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
संजय राऊत हे शिंदे गटावर वारंवार टीका करतात. आजही माध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार अपात्रता प्रकरणावरून शिंदेगटावर निशाणा साधला. यावरून एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. शिवसेना हा बाळासाहेबांचा पक्ष आहे. तो आम्ही पुढे नेतोय. यांनी सत्तेसाठी सर्व सोडलं. बाळासाहेबांचे विचार विकले. महाराष्ट्राच्या जनतेशी बेइमानी आणि विश्वासघात केला. त्यांना आमच्यावरती टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरे गट घाबरलेला आहे. डीप क्लीन ड्राईव्हमध्ये येणाऱ्या निवडणुकीत जनता यांना क्लिन करून टाकेल. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो. ती संस्था चांगली असते. जेव्हा त्यांच्या विरोधात लागतो. तेव्हा ती संस्था वाईट असते . हे लगेच आरोप करतात. विधानसभा अध्यक्षांवर आरोप करतात. हे लोकशाहीसाठी घातक आहे. याला जनता सडेतोड उत्तर येणाऱ्या निवडणुकीतील देईल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
काल कल्याणमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्यवर निशाणा साधला. त्यांना जनता धडा शिकवेल, असं ठाकरे म्हणाले. याला शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. जेव्हा पक्षाला गरज होती. एक तरुण चेहरा उच्चशिक्षित चेहरा त्यांना हवा होता श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी दिली. त्यांच्यामुळे पक्षाला एक जागा मिळाली. ती जागा आपण जिंकली. आता टीका करणं योग्य नाही, असंही शिंदे म्हणाले.