मुंबई | 13 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असणाऱ्या कल्याणमध्ये आहेत. इथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शिंदेंची घराणेशाही संपवायची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या ठाकरेंनी सांगायला पाहिजे. जे स्वत: चं घर आबाधित ठेवू शकले नाहीत. घरातल्या सगळ्यांना बाहेर काढलं. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढंच त्यांचं काम आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे आपल्या पक्षातील लोकांना सहकारी आणि सवंगडी म्हणून वागवत होते. परंतू उद्धव ठाकरे पक्षाला स्वत: ची खासगी कंपनी समजतात. आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी नाही. तर घरगडी नोकर म्हणून वागणूक देतात. त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर प्रहार केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाही विरोधात बोलतात. कालच पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येऊन गेले. जर घराणेशाहीला विरोध असेल. तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकिट नरेंद्र मोदीच कापतील. वापरा आणि फेका हे जे भाजपचं धोरण आहे. यात गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार आणि जर नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना टोला लगावला आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे गटाकडून आरती करण्यात येणार आहे. या महाआरतीसाठी ठाकरेंनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित केलं आहे. यावरून शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला. ही काय स्पर्धा आहे का? पंतप्रधान मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मोदींनी पूर्ण केलं आहे. मंदिर वहीं बनायेंगे तारीख नही बतायेंगे म्हणून हेच मोदीजींची चेंष्ठा करायचे. आता मोदींनी मंदिरही बांधलं. तारीखही सांगितली आणि आता उद्घाटनही होतंय. विरोधक प्रत्येक गोष्टीत राजकारण करतं आहेत. जनता बरोबर त्यांना उत्तर देईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.