मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात मुंबईत प्रवास करण्यासाठी अत्यावश्यक सेवा आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्यांना वाहनाला एक खास स्टिकर लावण्याचं आवाहन मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केलं होतं. यासाठी मुंबई पोलिसांनी खास 3 रंगाचे स्टिकर सिस्टम सुरु केली होती. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबईतील ही कलरकोड स्टिकर सिस्टीम बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. (Mumbai Colour Code Sticker System order cancel by Mumbai Police)
मुंबईतील पोलीस उपायुक्त अभियान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (18 एप्रिल) मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मुंबईतील वाहनांवर कलरकोड स्टिकर लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर काही ठराविक रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र अवघ्या सात दिवसात मुंबई पोलिसांनी हा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे आता मुंबईत कलरकोड स्टिकर लावणे बंधनकारक नाही, असे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.
राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी आणि कडक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र मुंबईतील वाहनांची वर्दळ कायम होती. यामुळे ही पद्धत सुरु करण्यात आली होती. यानुसार अत्यावश्यक सेवेतील खासगी वाहनांसाठी तीन कलर कोड निश्चित केले होते. मात्र नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम पाहायला मिळत होता. कोणत्या रंगाचा स्टिकर वाहनाला लावायचा याबाबत अनेकजण गोंधळले होते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना याबाबत अनेक सवालही विचारण्यात आले होते.
त्यामुळे मुंबई पोलिसांनी तयार केलेली ही पद्धत अवघ्या सात दिवसात त्यांच्यासाठी तापदायक बनली होती. त्यामुळे पोलिसांनी हा कलर कोडचा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईतील वाहनांना लाल, पिवळा, हिरव्या रंगाचे स्टिकर लावणे बंधनकारक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (Mumbai Colour Code Sticker System order cancel by Mumbai Police)
प्रिय मुंबईकरांनो.
लाल, पिवळा, हिरवा रंग #EmergencyStickers वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण #TakingOnCorona मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.#StayHomeStaySafe— Mumbai Police (@MumbaiPolice) April 23, 2021
“राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार आपण लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करत आहोत. महत्त्वाच्या चेक नाका, टोल नाक्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस, रुग्णवाहिका, रुग्णालये यांनाही याचा फटका बसत आहे. त्यामुळे आपण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी कलर कोड सुरु करत आहोत”, अशी माहिती हेमंत नगराळे यांनी दिली होती.
कलर कोड नेमका कशाप्रकारे?
मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कलर कोड दिला जाणार आहे. शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. वाहनांमधील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत आहेत का? याची तपासणी करण्यात येणार आहे. पोलीस, महानगरपालिका, पत्रकार, डॉक्टर अशाप्रकारे पोस्टर लावून कोणी फायदा घेत आहे का? याचीही पडताळणी केली जाणार आहे.
वैद्यकीय कर्मचारी यांच्या वाहनांसाठी लाल रंग, भाजीपालाच्या वाहनासाठी हिरवा रंग, इतर अत्यावश्यक सेवासाठी पिवळा रंग असणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना 6 इंच गोल सर्कल लावण्याच्या सूचना पोलीस आयुक्त यांनी दिल्या आहेत. (Mumbai Colour Code Sticker System order cancel by Mumbai Police)
संबंधित बातम्या :