देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कोर्टाने आरोपीवर संताप व्यक्त केला. एका अल्पवयीन तरुणाने तरुणीला डोळा मारला. कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावताना या कृत्यासाठी तर जन्मठेपेची शिक्षा सुद्धा कमी असल्याची टिप्पणी केली. पण आरोपीचे वय बघता कोर्टाने त्याची शिक्षा माफ केली. त्याला कोर्टाने दंड ठोठावला. अशा प्रकारच्या प्रकरणात जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात नुकतीच सुनावणी झाली.
प्राप्त माहितीनुसार, आरोपीविरोधात तरुणीने पोलिसात तक्रार केली होती. आरोपी तरुणाने तिला डोळा मारला होता. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. दोन्ही पक्षांनी त्यांची बाजू मांडली. युक्तीवादानंतर तरुणावरील आरोप सिद्ध झाले. हे प्रकरण गंभीर असल्याचे मत मांडत कोर्टाने तरुणाला जन्मठेपेची शिक्षा पण कमी असल्याचे ताशेरे ओढले. अशा प्रकारेमुळे पीडितेला मानसिक त्रास झाला आहे, याकडे कोर्ट दुर्लक्ष करु शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर कोर्टाने आरोपी तरुणाचे वय पाहता, त्याला मुक्त केले. त्याला पुन्हा असा प्रकार न करण्याची सक्त ताकीद दिली. अशा प्रकरणात भारतीय कायद्यानुसार,जास्तीत जास्त पाच वर्षांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे. पण यापूर्वी आरोपीविरोधात अशा कोणत्याही घटनेची तक्रार नाही. त्याच्यावर इतर कोणताही गुन्हा नाही. त्यामुळे भविष्यात अशी चूक न करण्याची ताकीद देत, न्यायालयाने त्याला सोडून दिले. पण आरोपीला 15 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
कधीचे आहे हे प्रकरण
पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण एप्रिल 2022 मधील आहे. दक्षिण मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली होती. घरा शेजारील दुकानातून तिने काही किराणा सामान मागवले होते. ते देण्यासाठी या दुकानावर काम करणारा तरुण घरी आला होता. ओळखीचा असल्याने तिने त्याला पिण्याचे पाणी देऊ का, अशी विचारणा केली. पाण्याचा ग्लास देताना आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले, तिचा हात धरला. तिला डोळा मारला. हा प्रकार घडताच पीडितेने आरडाओरड केल्यावर तरुणाने धूम ठोकली. आपण चुकून तिचा हात धरल्याचे तरुणाने न्यायालयासमोर सांगितले होते. तरुणीचा विनयभंग करणे अथवा तिला त्रास देण्याचा आपला उद्देश नव्हता, असे आरोपीने सांगितले.