मुंबई : धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला मुंबईपासून दूर जाण्याची गरज नाही, दक्षिण मुंबईतील इमारतीवरील धबधब्यात (South Bombay Building Waterfall) मनसोक्त भिजा, या मेसेजसह एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाला होता. कफ परेडमधील इमारतीतून ‘भदाभदा’ पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा व्हिडीओ पाहून सर्व जण अवाक झाले.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईला मुसळधार पावसाने (Mumbai Rains) झोडपलं आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेचा बोजवारा उडाल्यामुळे मुंबई कोलमडली. अशा परिस्थितीतही सोशल मीडियावर मुंबईकरांनी मीम्स शेअर करणं थांबवलं नव्हतं. त्यातच एका व्हिडीओ समोर आला, तो गगनचुंबी इमारतीतून कोसळणाऱ्या धबधब्याचा. बस, ट्रेनमध्ये अडकलेल्या मुंबईकरांनी हा व्हिडीओ शेअर करणं सोडलं नाही.
Waterfalls in New Cuffe Parade! #MumbaiRains pic.twitter.com/eqPQhGf73V
— K Sudarshan (@SudarshanEMA) September 4, 2019
कफ परेड भागातील 40 मजली इमारतीच्या गच्चीवरुन धबधब्याप्रमाणे खाली पाणी कोसळतानाचा हा 40 सेकंदांचा व्हिडीओ. मात्र हा धबधबा पावसाच्या पाण्यामुळे नाही, तर पाण्याच्या टाकीत गळती झाल्यामुळे होत होता.
लोढाच्या इमारतीतील डिओरो या इमारतीत नुकतीच पाण्याची नवीन टाकी बसवली होती, मात्र त्यात तडा गेल्यामुळे वेगाने इमारतीच्या गच्चीवरुन पाणी खाली पडत होतं. याला धबधब्याचं स्वरुप आलं, असं स्पष्टीकरण बिल्डरच्या वतीने ट्विटरवर देण्यात आलं आहे.
Msg from Lodha NCP team
(2 Sep) This evening there was an incident during testing of water tank at building T5 (Dioro). The vendor, was testing the new water tank which was recently installed, there was a rupture in the body causing the water to come out..— Ashish Dave (@ashishdave) September 4, 2019
सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचं पाणी साचल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र पुढील 48 तास मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील बहुतांश शाळांना गणेशोत्सवानिमित्त सुट्टी होतीच, मात्र जी शाळा-कॉलेजेस सुरु होती, तीसुद्धा आज (गुरुवार 5 सप्टेंबर) बंद ठेवण्याची घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
हवामान विभागाने पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावं, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि सुरक्षित स्थळी थांबा, अशी विनंती मुंबई पोलिसांनी नागरिकांना केली आहे. मदत लागल्यास ट्वीट किंवा 100 नंबरवर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अधूनमधून अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.