मुंबई : डोक्यावर गांधी टोपी, गळ्यात तुळशी माळ, पांढरा लेंगा आणि सफेद सदरा, अशी मुंबईच्या डब्बेवाल्यांची ओळख. मुंबईच्या डब्बेवाल्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ही ओळख कायम राखली आहे.. गिरणी कामगार, कार्यालय, शाळेतील विद्यार्थी यांना अचूक वेळेत आणि अचूक जागी डब्बे पोहचवण्याचे डब्बेवाले यांचे तंत्र जगात प्रसिद्ध आहे. ब्रिटनच्या राजापासून अनेकांनी मुंबईच्या डब्बेवाल्यांचे कौतूक केले आहे. इतकेच नव्हे तर त्यांना ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी पदवीही देता त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. मुंबईच्या सामाजिक आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेल्या अशा या डब्बेवाल्यांवर मात्र संक्रात आली आहे. मुंबईचा डब्बेवाला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आलाय. दिवसाला पाच लाख डब्ब्यांची देवाण-घेवाण करणारे हे डब्बेवालं आपलं अस्तित्त्व टिकवण्यासाठी झगडताना दिसत आहेत. याची नेमकी कारणे काय? याला कोण जबाबदार? जाणून घ्या.
मुंबईमध्ये डब्बेवाल्यांनी आपल्या बस्तान हे काही ठरवून मांडलं नाही. भारतात इंग्रजांचे राज्य होते तेव्हापासून हे डब्बेवाले काम करत आहेत. मुंबईत स्वांत्र्योत्तर काळात 1890 साली गेटवे ऑफ इंडिया, व्हिक्टोरिया टर्मिनस, मरीन ड्राईव्ह या भागात अनेक बांधकामं सुरु झाली होती. तेव्हा अनेक महत्वाची कार्यालये, स्थळे आणि ब्रिटिश कार्यालयात चविष्ट जेवणाची मागणी वाढू लागली. त्यावेळी ब्रिटिशांची हॉटेल व्यवसायात मक्तेदारी होती. पण, त्यांची ही मक्तेदारी पारशी समाजाचे सर सोराब आणि जिनोबिया पोचखानावाला यांनी ही मक्तेदारी मोडीत काढली. त्यांनी मुंबईतील पहिली खानावळ सुरू केली. यातूनच अधिकाऱ्यांचा अधिक वेळ जाऊ नये यासाठी कामाच्या ठिकाणी जेवण पोहोचवणाऱ्या जेवण वाहतूक प्रणाली डबेवाल्यांच्या रूपाने उदयास आली. महादू हावजी बच्चे हा मुंबईतला पहिला डब्बेवाला. सात बेटाच्या मुंबईच्या कक्षा त्यानंतर दिवसागणिक वाढत गेल्या. त्यानुसार डब्बेवाले यांची संख्या आणि त्यांच्या ग्राहकांची संख्याही उत्तरोत्तर वाढत गेली.
सुरूवातीला हातात घेऊन जाणारा डबा ग्राहकांच्या वाढत्या संख्येनुसार डोक्यावरील पाटीत गेला. डब्ब्यांची संख्या वाढू लागली. मग, हातावरून डोक्यावर गेलेल्या डब्ब्यांची वाहतूक करण्यासाठी बैलगाडी, हातगाडी, ट्राम, रेल्वे आणि रस्त्यावर घंटीचा निनाद करणाऱ्या सायकलीने त्याची जागा घेतली. पहाता पहाता मुंबईत पाच लाख डब्ब्यांची देवाणघेवाण होऊ लागली. कोणता डब्बा कोणाला द्यायचा याची गफलत होऊ नये म्हणून डब्बेवाल्यांची एक कोडिंग होती. डब्बेवाले काही फार जास्त शिकलेले नव्हते. पण, त्यांची ही कोडींग जगात एक नंबर अशीच होती. सुरूवातीला रंगीत चिंध्या, रंगीत खडूच्या खुणा, चिठ्या, धागे असे प्रयोग होत होते. पण, त्यात नंतर काळानुरूप बदल झाला. आता डब्बेवाले यांच्याजवळील डब्बे पाहिले तर डब्ब्याच्या झाकणावर कलर कोडींगद्वारे डब्यांचे वितरण सिक्स सिग्मानुसार केलेलं दिसतं.
ब्रिटिशांनीही डब्बेवाल्यांच्या या कामाचं कौतुक केलं होतं. शंभर वर्षापूर्वी ब्रिटिश डायरीनुसार भारतावर राज्य करत असताना विशेषतः मुंबईत ब्रिटिश अधिकाऱ्यांना सेवा देणाऱ्या डबेवाल्यांच्या कामाचा उल्लेख केला. ‘या लोकांनी वेळेवर कामाच्या ठिकाणी जेवण पोहोच करून अप्रत्यक्ष मुंबईतील बांधकाम तसेच प्रशासकीय कार्यात मदत केल्याने आम्हाला जास्तीत जास्त वेळ कामावर लक्ष देता आले’. अशा शब्दात त्याचं कौतुक करण्यात आलंय. डबेवाल्यांचा डब्बे देण्याचा फायदा असा झाला की अधिकारी एकत्र जेवण करताना सल्ला मसलत करायचे. त्यामुळे योग्य निर्णय घेऊन कामात अचूकता आणि वेग आला. डब्बेवाल्यांच्या चोख कामाची जगभर वाहवा होऊ लागली. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई लोकलमध्ये डब्बेवाल्यांची लगबग दिसायची. सगळ्यांना प्रश्न पडायचा की लाखो डब्बे अचूक ठिकाणी आणि अचूक वेळेवर कसे पोहोचवतात? डब्बेवाले यांच्याकडील डब्बा फक्त कामाच्या ठिकाणीच नाही तर तो सुखरूप डब्बा देणाऱ्याच्या घरीसुद्धा वेळेतच जायचा.
डब्बेवाल्यांच्या हे अतुलनीय काम पाहून ब्रिटिश राजघराण्यातील राजकुमार चार्ल्स हे 2004 साली डब्बेवाल्यांना भेटायला मुंबईत आले होते. त्यांनी डब्बेवाल्यांचे अचूक नियोजन आणि अद्भुत व्यवस्थापन प्रणालीची प्रशंसा केली. या भेटीने मुंबई डबेवाल्यांचे नाव सातासमुद्रा पार गेले. त्यानंतर व्हर्जिनचे मालक सर रिचर्ड ब्रँसन यांनी ही डबेवाल्यांना भेट देऊन कामाची वाहवा केली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डब्बेवाल्यांना राजकुमार चार्ल्स हे भेटण्यासाठी आले होते तेव्हाही त्यांनी आपल्या वेळेचं योग्य व्यवस्थापन केलं होतं. आपल्या ग्राहकांना त्यादिवशीही त्यांनी डब्बे पोहोचवले होते. त्यामुळे एक वेळ घड्याळाचा काटा पुढे मागे होईल पण मुंबईचे डब्बेवाले मात्र आपली वेळ पाळतीलच हा मुंबईकरांचा विश्वास अधिकच दृढ झाला. MBA च्या अभ्यासक्रमातही मुंबई डब्बेवाल्यांच्या व्यवस्थापनाचे धडे दिले जातात. काही डब्बेवाले तर शाळेतही गेले नव्हते जास्तीत-जास्त चौथी ते आठवी शिकलेल्या या डब्बेवाल्यांकडून वेळ आणि व्यवस्थापन ही गोष्ट शिकण्यासारखी होती.
मुंबईचा डब्बेवाला जगभरात प्रसिद्ध झाला. पण, आता तो फार मोठ्या प्रमाणात दिसत नाही. अचानक असं काय झालं की डब्बेवाल्यांच्या सेवा आता जवळपास बंद झाली? मुंबईमध्ये डब्बा पोहोचवण्याचे काम सुमारे पाच हजार डब्बेवाले कामगार करत होते. परंतु, आता ही संख्या अवघी एक हजार राहिली आहे. मग, चार हजार कामगार गेले कुठे? त्यांचं पुढे काय झालं? या कामगारांच्या संख्येत इतक्या मोठ्या प्रमाणात घट कशाने झाली? असे प्रश्न उपस्थित होतात.
कोरोना महामारीचा मुंबईच्या डब्बेवाल्यांनाही सर्वात मोठा फटका बसला. जगभरात लॉकडाऊन असल्यामुळे सर्व जग थांबलं होतं. उद्योदधंद्यांसह सगळं काही बंद होतं. कंपन्यांनी ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केलं. याआधी असं कधी कंपनीचं काम घरातून केलं नव्हतं. मात्र, कोरोना काळात सुरू झालेल्या वर्क फ्रॉम होममुळे डब्बेवाला मागे पडला. कोरोना काळात फक्त सरकारी नोकरदाराना लोकलने जाण्याची परवानगी होती. महत्त्वाचं म्हणजे सगळेच ऑफिस आणि कार्यालय बंद होते. त्यामुळे याचा परिणाम डब्बेवाल्यांच्या कामावर झाला, अशी प्रतिक्रिया मुंबई डबेवाला अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिली.
कोरोना काळात आमच्या व्यवसायाला सर्वात मोठा फटका बसला. कोरोनामध्ये सुरू झालेल्या वर्क फ्रॉम होममुळे आमचे अनेक डबे बंद झाले. आम्ही आता आमचं नेटवर्क बाहेर नेण्यासाठी काम करत असल्याचं उल्हास मुके म्हणाले. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट कल्चर आले आहे. जवळपास प्रत्येक कंपनीने स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था केलीय. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचा नोकरदार वर्ग आला आहे. पण, घरातून डबा मिळण्याची कोणताही सोय त्यांच्याकडे नाही. पण हाच वर्ग आता कॅन्टीन किंवा फुड डिलीव्हरी ॲपवरून जेवण मागवू लागले. फुड डिलीव्हरी करणाऱ्या ॲपचा डब्बेवाल्यांच्या व्यवसायावर काही मोठा परिणाम झाला नाही. कारण मुंबईतील नोकरदारवर्ग आपला घरचाच डब्बा खाणे पसंद करत आहे. परंतु, कोरोनामुळे जिथे जगाचंच नुकसान झालं तिथे मुंबईचे डब्बेवालेही भरडले गेले नसते तर नवलच. पण, शेवटी डब्बेवाला घरचा जो डब्बा आणायचा ती सेवा अगदी प्रामाणिक असायची. जोपर्यंत आपल्या ग्राहकला डब्बा पोहोचवत नाही तोपर्यंत तोसुद्धा जेवण करायचा नाही.
मुंबई डब्बेवाला संघटनेने आता नवीन संकल्पना केली आहे. आपला व्यवसाय पुन्हा वाढवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मात्र, डिजीटल युगात तंत्रज्ञानाची मदत घेत मुंबईच्या डब्बेवाल्यांनी आपल्या मॅनेजमेंटमध्ये बदल करत कोणती तरी वेगळी सेवा सुरु करावी असे अनेक जणांचे मत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे डब्बेवाल्यांवर असेलला ग्राहकांचा डोळे झाकून विश्वास… अगोदर केलेल्या कामामुळे प्रामाणिक आणि विश्वासार्हता डब्बेवाल्यांनी आपल्या सेवेमध्ये विश्वास मिळवला आणि तो टिकवलाही. अनेक जणांचे संसारही वाचलेत, डब्ब्यामध्ये दिलेली चिठ्ठी डब्बावाला वाचणार नाही हा अनेकांच्या मनातील विश्वासाला ते पात्र ठरले आहेत. कोणताही निरोप असो जसा की घरातील किराणा मालाची यादीही डब्ब्यांमधून पाठवली जात होती. कारण, त्यावेळी आतासारखी फोनसेवा नव्हती. आता डोक्यावर गांधी टोपी, पांढरा लेंगा, सदरा घातलेला रूबाबदार मुंबईचा डब्बेवाला कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये माळी, हाऊस कीपिंगमध्ये काम करत आहे.
मुंबई डब्बेवाल्यांसाठी भवन उभारणी आणि अत्याधुनिक सुविधा युक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे डब्बेवाला संग्रहालय उभारले जात आहे. बांद्रामधील रेल्वे कॉर्नर या ठिकाणी 350 चौरसफूटामध्ये डब्बेवाला संग्रहालय होणार असल्याची माहिती उल्हास मुके यांनी दिली. 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाने जाहीरनाम्यात ‘मुंबई डबेवाला भवन’ उभारु अशी घोषणा केली होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या भूमिपूजन केले आहे. पण, 2019 मध्ये आलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दोन अडीच वर्षापासून त्याचे काम रखडले आहे. कामाला म्हणावी तशी गती मिळाली नाहीय अशी खंतही उल्हास मुके यांनी व्यक्त केली.