शिवसेनेचा दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती शिवाजी पार्क मैदानावरची प्रचंड सभा… शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य सभा याच शिवाजी पार्क मैदानावर होत असत. पण 2022 ला शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या सभेच्या जागेवरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी मागण्यात आली. यंदा या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. यंदा या मैदानावर कुणाची सभा होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी मुंबई महापालिकेला अर्ज करण्यात आला आहे. या अर्जासोबतच मागील आठ महिन्यात तीन स्मरणपत्र देखील देण्यात आली आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून अद्यापपर्यंत अर्ज केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर दसरा मेळाव्याच्या सभेसाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिकेने ठाकरे गटाला सभेसाठी परवानगी दिली होती.
दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये, यासाठी काही महिन्याआधीच शिवसेना ठाकरे गटाच्या विभाग प्रमुखांकडून अर्ज आणि स्मरणपत्र महापालिकेला देण्यात आली आहेत. गणेशोत्सवानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या या अर्जासंदर्भात मुंबई महापालिका निर्णय घेणार असल्याची माहिती आहे. 18 सप्टेंबरनंतर मुंबई महापालिका परवानगी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊन संबंधित अर्जदाराला याबाबत कळवणार आहे.
शिवसेना शिंदे गटाकडून यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मेळावा यासाठी अद्याप अर्ज केली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं, यासाठी अर्ज करणार का? याची प्रतीक्षा आहे.