मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल

| Updated on: Jan 07, 2025 | 10:13 AM

मुंबईतील दादर परिसरात टोरेस कंपनीने मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. आर्टिफिशियल डायमंड विक्रीच्या नावाखाली, उच्च व्याजदराचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले आणि नंतर गुंतवणूकदारांची फसवणूक केली. पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हा दाखल केला असून, १३ कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे.

मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा, घसघशीत रिटर्न्स मिळण्याच्या नादात मुंबईकरांची लूट; गुन्हा दाखल
torres company mumbai
Follow us on

Mumbai Torres Jewellery Scam : मुंबईतील दादर परिसरात एक मोठा आर्थिक घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने हजारो मुंबईकरांना गंडवले आहे. आर्टिफिशल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला 6 टक्क्यांपासून 10 टक्क्यांपर्यंत परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले. त्यानंतर गुंतवणूकदारांची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची सातत्याने चर्चा होत होती. टोरेस ही विदेशी कंपनी होती. ही कंपनी सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते. मात्र, हे दागिने बनावट होते. गेल्यावर्षी या कंपनीने मुंबईतील दादर परिसरात पहिले कार्यालय सुरु केले होते. यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेन तयार झाली होती. या कंपनीत गुंतवलेल्या रक्कमेवर 6 टक्क्यांपासून 11 टक्क्यांपर्यंत व्याज दिला जात होता. फक्त सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल, असे अमिष दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले.

टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या 4000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवारदरम्यान त्याचा परतावा देत असे. सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी 6 टक्के व्याज देत होती. तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11 टक्के व्याज मिळत होते. सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला होता. त्यामुळे गुंतवणुकदारांचा विश्वास बसला. यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले. मात्र टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला.

गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालेला नाही. अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते. मात्र, आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, भाईंदर यांसह ठिकठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली. अनेक गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

13 कोटी 48 लाख 15 हजार 092 रुपयांची फसवणूक

याप्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार अशी गुन्हा दाखल करणाऱ्या पाच जणांची नावे आहेत. या पाच जणांविरोधात कलम 318(4), 316 (5), 61, बी.एन.एस सह एम.पी.आय.डी.ॲक्ट कलम 3, 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादरमधील टोरेस कंपनीने 13 कोटी 48 लाख 15 हजार 092 रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी तक्रारीत नमूद केले आहे. आता याप्रकरणी पुढे काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मात्र या घटनेनंतर अनेक गुंतवणूकदारांवर पश्चात्तापाची वेळ आली आहे. आम्हाला व्याज नको. पण आम्ही गुंतवलेले पैसे तेवढे परत करा अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. या कंपनीकडून गेल्या काही दिवसांपासून कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.