Mumbai Govinda Injury Report : मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडत असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविंदांवर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 2 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ठाण्यात 19 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईसह ठाण्यात सुरु असलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान थरावरुन कोसळून गोविंदा जखमी होतात. त्यामुळे या गोविंदांसाठी आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात आली होती. यंदाही थरावरुन कोसळून काही गोविंदा जखमी झाले. या गोविंदांवर केईएम, नायर, शीव, कूपर आणि इतर प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आता नुकतंच मुंबई महापालिकेकडून जखमी गोविंदांचा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल आहेत, याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत आज सकाळी 6 वाजेपर्यंत विविध पथकातील 238 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 52, नायर रुग्णालयात 12, सायन रुग्णालयात 20, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 08, जी टी हॉस्पीटल 05, पोद्दार रुग्णालय 18, राजावाडीमध्ये 13, एमटी अगरवाल रुग्णालयात 02 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात 05 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच जे.जे हॉस्पिटल 04, वीर सावरकर रुग्णालय 03, शताब्दी गोवंडी रुग्णालय 13, वांद्रे भाभा रुग्णालय 09, ट्रॉमा केअर रुग्णालय 21, व्ही एन देसाई हॉस्पिटल: 29, MW देसाई हॉस्पिटल 02, कूपर हॉस्पिटल 03, BDBA रुग्णालय 18, लीलावती रुग्णालयात एका गोविंदावर उपचार सुरु आहेत.
यात केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे, तर सेंट जॉर्जेस रुग्णालयात दोन बालगोविंदा जखमी झाले आहेत. उपचार घेत असलेल्या गोविंदांमध्ये काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुंबईसह ठाण्यातही 19 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबईत एकूण 238 जखमी गोविंदाची नोंद करण्यात आली आहे. यातील 32 गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील दोन जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.