Mumbai Viral Patient Increases : राज्यात गेले काही दिवस सातत्याने पाऊस कोसळत आहे. यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता पावसामुळे होणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. राज्यात लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरिया इत्यादी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुंबईत अनेकांना डेंग्यू, मलेरियाची लागण होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता मुंबईत जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात साथीच्या आजारात दुपटीने वाढ झाली आहे.
मुंबईत पावसाळ्यात अनेक साथीचे आजार उद्भवत असतात. या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अपयशी ठरत आहे. जूनच्या तुलनेत जुलै महिन्यात साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत जूनमध्ये साथीच्या आजाराचे 1395 रुग्ण सापडले होते. जुलै महिन्यात त्यात दुपटीने वाढ झाली आहे.
मुंबईत जुलै महिन्यात 3044 रुग्ण सापडले आहेत. त्यात गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू, कावीळ, स्वाईन फ्लू आणि लेप्टो या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मोठा पाऊस
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात 3 हजार 44 रुग्ण सापडले आहेत. जूनमध्ये महिन्याभरात सापडलेल्या 1 हजार 395 रुग्णांच्या तुलनेत जुलै महिन्यात अधिक रुग्ण सापडले आहेत. जुलै महिन्यात मुंबईतील साथीच्या आजारांमध्ये गॅस्ट्रोचे सर्वाधिक 1239 रुग्ण सापडले आहे. त्याखालोखाल हिवताप 797 रुग्ण, डेंग्यू 535 रुग्ण, स्वाईन फ्लू 161 रुग्ण, कावीळ 146 रुग्ण, लेप्टोचे 141 रुग्ण आणि चिकुनगुन्याचे 25 रुग्ण सापडले आहेत.
जूनच्या तुलनेत जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. या पावसामुळे साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे, असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.