चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

| Updated on: Sep 25, 2023 | 4:20 PM

Devendra Fadnavis on Chandrashekhar Bawankule Viral Audio Clip : पत्रकारांच्या चहापानाची सोय करा; चंद्रशेखर बावनकुळे यांचा व्हीडिओ व्हायरल, स्पष्टीकरण देताना काय म्हणाले? दरम्यान, चंद्रशेखर बानवकुळे यांच्या वक्तव्याचा कोल्हापुरातील पत्रकारांनी निषेध केलाय. वाचा...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या त्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Follow us on

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांना मॅनेज करण्याविषयी बोलताना दिसत आहेत. यावर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भाजपचे वरिष्ठ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे जे बोलले आहेत. त्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही गोष्टी आपण वेगळ्या अर्थी बोलतो. पण त्यावर कॅान्ट्रोव्हर्सी करणं योग्य नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय?

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच आता सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे. भाजपच्या एका बैठकीतील ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज चंद्रशेखर बावनकुळे यांचा असल्याची चर्चा होतेय. यात बावनकुळे 2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नयेय यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा. त्यांना चहा प्यायला बोलवायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे तुम्हाला समजलंच असेल. त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे.

बावनकुळे यांचं स्पष्टीकरण

चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:ही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आपलं चांगलं काम पत्रकारांच्या मार्फत लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. असं मी पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. पण काही माध्यमांनी याच्या चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या. लोकांपर्यंत चांगलं काम गेलं पाहिजे, इतकंच माझ्या बोलण्याचा उद्देश होता, असं बावनकुळे म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही या व्हायरल व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे सच्चे कार्यकर्ते आहेत. ते प्रशासनाच्या मागे लागून काम करत आहेत. ते काय बोललेत मला माहिती नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.

पत्रकारांकडून निषेध

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांविषयी केलेल्या आक्षेपार्ह कोल्हापुरातील पत्रकारांनी निषेध केला आहे. कोल्हापुरी पायतान दाखवत आणि काळा चहा पिऊन पत्रकारांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या बावनकुळेंना कोल्हापुरी हिसका दाखवू, अशी भूमिकाही या पत्रकारांनी घेतली आहे.