धारावीत भीषण अपघात, टँकरने धडक दिल्याने तब्बल 6 कार खाडीत

| Updated on: Jan 03, 2025 | 9:15 AM

एका टँकरने काही गाड्यांना धडक दिल्याने तब्बल सहा कार खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. सध्या या परिसरात वाहने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

धारावीत भीषण अपघात, टँकरने धडक दिल्याने तब्बल 6 कार खाडीत
dharavi accident
Follow us on

Dharavi Accident : गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत ठिकठिकाणी भीषण अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यातच आता मुंबईतील धारावी परिसरात भीषण अपघात झाला आहे. यात एका टँकरने काही गाड्यांना धडक दिल्याने तब्बल सहा कार खाडीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. सध्या या परिसरात वाहने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील धारावी परिसरातील माहीम उड्डाणपूल परिसरातील रहेजा रुग्णालयात परिसरात एक टँकरचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या टँकरने सुरुवातीला काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर हा टँकरने रहेजा रुग्णालयात परिसरात असलेल्या वाहनांना धडकला. त्यामुळे खाडीकिनारी उभी असलेली वाहने खाडीत कोसळली. यावेळी एक दोन नव्हे तर सहा कार खाडीत कोसळल्या.  ही सर्व वाहने खाडीकिनारी उभी होती. त्यावेळी ही घटना घडली.

टँकर चालक ताब्यात

सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले असून खाडीत पडलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचे काम करण्यात येत आहेत. या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. या प्रकरणी टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

मुंबईतील धारावी खाडीजवळ उभ्या असलेल्या वाहनांना एका भरधाव लॉरीने अचानक धडक दिली. त्यानंतर 5 वाहने खाडीत पडली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो धारावीकडून सायन आणि वांद्रेकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहने उभी केली जातात. या घटनेनंतर लॉरी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत चालकाने सांगितले की, लॉरीवर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. खाडीत पडलेल्या सर्व वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास धारावी पोलीस करत आहेत.

कोणालाही दुखापत झालेली नाही

धारावीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाला. यावेळी 5 ते 6 वाहने खाडीत पडली. यावेळी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. सध्या खाडीत पडलेली वाहने पाण्यातून बाहेर काढली जात आहेत.

नाशिकमध्ये दुचाकीचा अपघात, एकाचा मृत्यू

तर दुसरीकडे नाशिकमध्ये दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. यात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी नाशिकच्या सिडको परिसरात दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात गौरव पाटील या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गौरव हा सिडको येथील पवन नगर परिसरात राहत होता.