डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्र्यांना काय केली सूचना?

| Updated on: Apr 14, 2023 | 5:36 PM

इंदू मिल कंपाउंड येथे आकार घेत असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सर्वांसाठी व विशेषतः देशातील युवकांसाठी प्रेरणास्थळ सिद्ध होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती; राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्र्यांना काय केली सूचना?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) व विशेषतः मुंबई ही डॉ बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची कर्मभूमी होती. या शहरात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले. पक्षाचे कार्य केले तसेच निवडणूक देखील लढवली. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा या शहरात आहे. ही स्थळे सर्वांना पाहता यावी याकरिता मुंबई दर्शन बससेवेप्रमाणे ‘डॉ आंबेडकर सर्किट दर्शन’ अशी बससेवा सुरु करण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी केली. तसेच इंदू मिल कंपाउंड येथे आकार घेत असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सर्वांसाठी व विशेषतः देशातील युवकांसाठी प्रेरणास्थळ सिद्ध होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर पुष्पांजली अर्पण केली. महामानवास अभिवादन केलं. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते चैत्यभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवरदान (पवित्र वस्त्र) देण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईचे पालक मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर आदी उपस्थित होते.

‘इंदू मिलचे स्मारक कसे असेल?

आज भारत जगात सशक्त लोकशाही देश म्हणून उभा आहे, याचे श्रेय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच
इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असे स्मारक निर्माण होत असल्याचे सांगून स्मारकासंदर्भात प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन स्मारकातील त्रुटी दूर करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

.. यांचे कार्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावे- फडणवीस

जगाच्या इतिहासात समाज उत्थानासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवावे असे आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे, याचे कारण डॉ आंबेडकर यांनी दिलेले संविधान असल्याचे त्यांनी सांगितले. ‘द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी’ हे पुस्तक 100 वर्षांपूर्वी लिहून डॉ आंबेडकर यांनी देशाला काळ्या पैशाच्या समस्येतून बाहेर कसे काढता येईल, याचे विवेचन केले होते. त्यातून त्यांचे द्रष्टेपण दिसून येते, असे फडणवीस यांनी सांगितले.