अक्षय मंकणी, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 06 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीचे नेते, विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना काल हृदयविकाराचा झटका आला. त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केलं. यावेळी खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे, एकनाथ खडसे यांच्यावर उपचार करणारे डॉ.अभिषेक ठाकुर हे इथे उपस्थित होते. डॉ. अभिषेक ठाकुर यांनी खडसेंच्या तब्येतीविषयीची माहिती शरद पवार यांना दिली.
एकनाथ खडसे यांना काल दुपारच्या सुमारास हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईत दाखल करण्यात आलं. एकनाथ खडसे यांना हृदय विकाराचा झटका आल्याने जळगावमध्ये त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. तर पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला आणण्यात आलं आहे. एअर अॅम्ब्युलन्समधून खडसे यांना मुंबईत आणण्यात आलं. यावेळी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, कन्या रोहिणी खडसे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक त्यांच्यासोबत होते.
रोहिणी खडसे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवरून चर्चा झाली. यावेळी पुढच्या उपचारासाठी एकनाथ खडसे यांना मुंबईत आणण्याची गरज रोहिणी यांनी बोलून दाखवली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय विभागाला सूचना दिल्या. एकनाथ खडसे यांच्यासाठी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करू देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर कार रात्री उशीरा एकनाथ खडसे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तिथे आता उपचार सुरु आहेत. तर दोन दिवसांपासून खडसे यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं रोहिणी खडसे म्हणाल्या.
दोन दिवसापासून एकनाथ खडसे यांच्या छातीत बर्निंग सेंच्युरीनचा त्रास होता. ते रुटीन चेकअप केलं तेव्हा काही बाबी समोर आल्या. खडसे यांच्या रक्तातील साखर स्थिर आहे. छातीत थोडं कंजेशन आहे. त्यांच्यावर अॅन्जिओग्राफी करण्याचीही गरज असल्याचं खडसे यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. डॉ. विवेक चौधरी यांनी त्यांच्या तब्येतीचे अपडेट दिले.