मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अनिल देशमुख हे बराच काळ तुरुंगातही होते. आता मात्र त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
खंडणीचे आठ गुन्हे
दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. हा परमबीर सिंह यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचे आठ गुन्हे होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
मन्सुख हिरेन प्रकरण समोर आलं
विद्यमान सरकारने निलंबन मागे घेतलय. 2021 मध्ये त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. पण आता निलंबन मागे घेतलय. म्हणजे निलंबनाच्या काळात ते सेवेत होते, असं समजलं जाईल. परमबीर सिंह आता निवृत्त झालेत, त्यामुळे ते पुन्हा सेवेत येणार नाहीत. परमबीर सिंह आयुक्त पदावर असतानाच मन्सुख हिरेन प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी सचिन वाझे याच्यावर गंभीर आरोप झाले होते. मन्सुख हिरेन प्रकरणातच सचिन वाझे तुरुंगात आहे.