Mumbai Ghatkopar Fire : मुंबईतील घाटकोपर परिसरात असलेल्या एका इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत 13 जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून ही आग आटोक्यात आणण्यास यश आले आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील घाटकोपर परिसरातील पंतनगर भागात असेलल्या रमाबाई कॉलनीमधील शांती सागर इमारतीत रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या विद्युत मीटर केबिनमध्ये आग लागली होती. यामुळे इमारतीतील वायर जळून खाक झाल्या. तसेच या आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. ही आग लागल्यानंतर इमारतीत पळापळ सुरु झाली. त्यामुळे काही रहिवाशी हे मजल्यांवर अडकले होते.
Maharashtra | Fire broke out in a building in the Ghatkopar area of Mumbai. Fire tenders reached the spot and brought the fire under control. More than 90 people were rescued safely. 13 people have been injured in the fire incident who have been admitted to the nearest…
— ANI (@ANI) September 14, 2024
शांती सागर इमारतीत लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत साधारण एक ते दीड तासात आग आटोक्यात आणली. यादरम्यान विविध मजल्यांवर अडकलेल्या 80 ते 90 जणांना रेस्क्यू करण्यात आले.
या आगीमुळे झालेल्या धुरामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला. यावेळी तब्बल 13 जण गुदमरल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. हर्ष अनिल भिसे, स्वीटी संदीप कदम, जान्हवी मिलिंद रायगावकर, प्रियंका काळे, जसिम सलीम सय्यद, ज्योती मिलिंद रायगावकर, फिरोझा इक्बाल शेख, लक्ष्मी लक्ष्मण कदम, लक्ष्मण रामभाऊ कदम, मानसी श्रीवास्तव, अक्षरा सचिन दाते, अबिद शाह, अमिर इक्बाल खान अशी जखमींची नावे आहेत. यातील १२ जणांना अॅडमिट करण्यात आले असून एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्या काही दिवसांपूर्वी मुंबईतील लोअर परळ भागातील कमला मिल परिसरात असलेल्या टाइम्स टॉवरला भीषण आग लागली. ही घटना 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6.29 वाजता घडली. अग्निशमन दलाच्या 9 गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जखम किंवा जीवितहानी झालेली नाही.