मुंबई | 20 जानेवारी 2024 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी असंख्य मराठा बांधव मुंबईच्या दिशेने येत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हा मोर्चा मुंबईकडे येतो आहे. यावर राज्याचे ग्रामविकास आणि मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांना त्यांनी आवाहन केलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कुच केलीय. पण मराठा आरक्षण हे कायद्यानंच घ्यावं लागेल. आरक्षणाबाबतचं काम अंतिम टप्प्यात आहे. संयमानं घेतलं तर 100 % मराठा समाजाला आरक्षण मिळेल. टिकणारं आरक्षण मराठा मिळायला हवं. त्यासाठी सरकार प्रयत्न करतं आहे, असं गिरीश महाजन म्हणालेत.
रोजगार निर्मीती आणि मुंबईची ओळख नव्यानं निर्माण करण्याकरता महामुंबई एक्स्पो सारखा कार्यक्रम आयोजित केला जातोय. नऊ दिवस हा कार्यक्रम मुंबईत होईल. क्रिकेटपटू देखील या ठिकाणी येणार आहेत. यातून मुंबईच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. महा मुंबई एक्स्पोचं तिकीट 150 रुपये आहे. हे मला माहित नव्हतं. याबाबत आयोजकांशी बोलतो, असंही गिरीश महाजन म्हणालेत.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. या दिवशी ठाकरे गटाच्या वतीने नाशिकमधील काळाराम मंदिरात पूजा केली जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित असणार आहेत. यावरही गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचाय. त्यामुळे त्यांनी काळाराम मंदिरात जातायेत. त्यांनी इतरही कोणत्याही मंदिरात जावं, असं गिरीश महाजनांनी म्हटलं.
संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावरून गिरीश महाजनांनी पलटवार केला आहे. सकाळी-सकाळी उठून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत बसतात. आपली पात्रता आहे का तेवढी? नरेंद्र मोदी इथे येतायेत. तुम्ही तुमच्या नेत्यांना बाहेर काढा ना…, असं आव्हान महाजांनी संजय राऊतांना दिलंय.
काहीही झालं तरी आक्षेप घेणं, ही विरोधकांची रीत आहे. ते दावोस बद्दल बोलतीलच. दावोस च्या MOU क्लिअर आहेत. आम्ही त्या दाखवायला तयार आहोत, असंही गिरीश महाजन म्हणाले.