सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Mumbai Goa Highway Toll) विवादीत ओसरगाव टोलनाका (Osargaon Toll) अखेर उद्यापासून (1 जून) पासून सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरुन प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या टोलनाक्याला विरोध केला होता. एवढ्यात टोल सुरु करु नका, असं अनेकांनी म्हटलं होतं. टोल सुरु केला, तर आंदोलन करु असा इशाराही देण्यात आला होता. अखेर उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाका सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सगळी तयारीदेखील पूर्ण झाली आहे. या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय. ओसरगावसोबत राजापूर-हातीवले (Rajapur Toll) मधील टोलही उद्यापासून सुरु होणार आहे.
मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झालं असून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ओसरगाव हा टोल कधी सुरु होणार, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं होतं. तूर्तास टोल सुरु करु नये यावरुन राजकारणंही तापलेलं. दरम्यान, उद्पासून ओसरगावचा टोलनाका सुरु करण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान हा टोलनाका सुरु होत असल्यानं वाहनचालकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय.
टोल सुरु केल्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांना भुर्दंड बसेल, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान. टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे.
बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.
जीप, व्हॅन, कार – सिंगल जर्नी 90 रुपये
रिर्टन जर्नी टोल घेतल्यास 135 रुपये दर
हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी 135 रुपये
रिटर्न जर्नीसाठी 220 रुपये
ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल) – 305 रुपये
रिटर्न जर्नीसाठी 460 रुपये
ट्रक आणि बस (ट्रिपल अँक्सल) – 335 रुपये
रिटर्न जर्नीसाठी – 500 रुपये
MH 07 पासिंग वाहनांसाठी 45 रुपये टोल
MH 07 पासिंग मिनीबससाठी 75 रुपये
MH 07 पासिंग ट्रक-बससाठी 115 रुपये
दरम्यान, मुंबई गोवा महमार्गाचं संपूर्ण काम अजूनही पूर्णत्वास आलेलं नाही. काही भागात अजूनही काम सुरु आहे. अशावेळी टोल सुरु करण्याची घाई का केली जाते आहे, असा सवाल उपस्थित केला जातोय. रंगीत तालीम म्हणून 26 मे रोजी ओसरगावचा टोलनाका अचानक सुरू करण्यात आला होता. अखेर वाढचा विरोध पाहून संध्याकाळी टोलची रंगीत तालिम थांबवावी लागली होती. 27 मे पासून खरंतर टोल सुरु होणं अपेक्षित होतं. मात्र आता 1 जून पासून कोकणातील दोन्ही टोल पूर्ण क्षमतेनं सुरु केले जाणार असल्याचं स्पष्ट आहे.