मुंबई : जून महिना लागला असून पहिला पाऊस कधीही पडू शकतो. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं (BMC) देखील पाणी तुंबू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. यातच आता एक चांगली बातमी आहे. पूरमुक्त मुंबईसाठी पालिका (Mumbai Municipal Corporatio) वेगानं उपाययोजना करताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत पाणी तुंबणारी 386 पैकी तब्बल 282 ठिकाणे कमी करण्यात यश आलंय. गेल्या एका वर्षातच शिल्लक राहिलेल्या 34 ठिकाणी उपाययोजना केल्यामुळे ही ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत. पावसाळ्यात साचणारे पाणी उपसण्यासाठी 477 उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. त्यामुळे यंदा जून (JUNE) महिन्याच्या सुरूवातीपर्यंत बऱ्यापैकी पालिकेनं काम पूर्ण केल्याचं दिसतंय. नसता अनेकांच्या घरात पाणी साचल्याच्या घटना दरवर्षीच्या असतात. यामुळे मुंबईकरांना मोठा मनस्तापही सहन करावा लागतो.
पावसाळा तोंडावर आला असला तरी पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्वी कामे पूर्ण होत असल्याचं अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी सांगितलंय. यामध्ये महत्वपूर्ण असणाऱ्या नालेसफाईचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून आता अधिकचा गाळ काढण्यात येत आहे. तर पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी पालिकेच्या माध्यमातून नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येत असल्यानं ही ठिकाणे कमी होत आहेत. या वर्षी मुंबईभरात पाणी तुंबणारी 104 ठिकाणे शिल्लक होती. यातील 34 ठिकाणी पंप बसवणे, रस्ते- नाल्यांची दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्या टाकणे अशा उपाययोजना केल्यामुळे ही ठिकाणे पूरमुक्त झाली आहेत.
अतिवृष्टीमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची होणारी गौरसोय टाळण्यासाठी हिंदमाता या ठिकाणी प्रमोद महाजन उद्यान याठिकाणी 3.6 कोटी लिटर पाणी साठवणारी भूमिगत टाकी बांधण्यात आली आहे. तर सेंट झेवियर्स मैदानाखाली 2.8 कोटी लिटर्स पाणी साठवण्याची क्षमता असणाऱ्या भूमिगत टाक्या बांधण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीत हिंदमाता या ठिकाणी साचणारे पाणी या भूमिगत टाक्यांमध्ये पंपांच्या सहाय्याने पोहोचवून साठविण्यात येणार असून पाऊस ओसरल्यानंतर या पाण्याच्या निचरा केला जाणार आहे. त्यामुळे सलग चार तास पाऊस पडला तरी या ठिकाणी पाणी तुंबणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.