गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली. या सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. येत्या 10 दिवसात आरक्षण द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. या सभेतील भाषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर जोरदार टीका केली. याला आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांही उत्तर दिलं आहे. मुंबईत टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर दिलं.
मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. यावेळी अनेक मराठा बांधव उपस्थित होते. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केलं. ही काही भव्य सभा नाही. तर मनोज जरांगे पाटील यांची ही पराभूत मनोवृत्ती आहे. ही तर फक्त जरांगे जत्रा होती! फार मोठी सभा नव्हती. सगळे मौज करून गेले. ते रानभूले, यात संविधानात्मक दृष्टीकोन नाही, असं सदावर्ते म्हणालेत.
मी खुल्या प्रवर्गाचा वकील आहे. मी वकिलपत्र स्विकारलं आहे. आम्ही डंके की चोट पर म्हणतो की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही… नाही… नाही… मराठा आरक्षण जर सरकारने दिलं. तर त्याला आमचा कडाडून विरोध असेल, असं गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.
मराठा प्रवर्ग मागतात. मग कुणबी मागतात, हे त्यांनाच माहीत नाही. शरद पवार हे जरांगेचे बॉस आहेत. शरद पवार जसं बोलतात तसं ते करतात. शरद पवारांच्या भूमिकेवर जरांगे बोलतात. ते कसे पोहोचले जरांगे पाटलांकडे ते विचारा…, अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
माझी हत्या होऊ शकते, अशी सध्याची परिस्थीती आहे. मला जीवे मारण्याची धमकी येतेय. मला रात्री बेरात्री शिवराळ मेसेजेस येत आहेत. घराबाहेर पोलीस आहेत. त्यामुळे राज्य सरकार माझी जबाबदार घेईल. जर खुल्या गुणवतांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मी सुद्धा आंदोलन करेन. मी सुद्धा उपोषण करेन. जरांगे पाटील यांच्यासारखं सलाईन लावणार नाही. प्राणांतिक उपोषण करणार आहे. खुली चर्चा करा. मला बोलवा. मी चर्चेला तयार आहे. मराठा आरक्षणावर सरकारने चर्चा ठेवावी. मी येईल, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणालेत.