मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतवर वादग्रस्त शेरबाजी करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले आहे (Mumbai High Court criticize Sanjay Raut and BMC). संजय राऊत यांनी एका मुलाखतीत कंगनाचा उल्लेख ‘हरामखोर लडकी’ असा केला होता. यावरच न्यायालयाने आक्षेप घेतला आहे. तसेच राऊत यांच्या वकिलाला तुम्हाला हे बरोबर वाटते का असा प्रश्न विचारला आहे. याचबरोबर न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयावरील बीएमसीच्या कारवाईवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही देखील कंगनाच्या मुंबईविषयीच्या मताविषयी सहमत नाही, पण याचा अर्थ तुम्ही तिचं घर पाडावं असा आहे का? असा प्रश्ना न्यायालयाने विचारला.
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे. कथावल्ला आणि न्यायमूर्ती आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने आज (29 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता या प्रकरणी सुनावणी केली. यावेळी सर्वच पक्षांनी आपली बाजू मांडली. संजय राऊत यांच्यावतीने अॅड. आदिती एस. यांनी युक्तिवाद केला. त्या म्हणाल्या, “माझ्या अशिलाचा बीएमसीच्या पाडकामाशी काहीही संबंध नाही. तसेच त्यांच्याकडून कंगनाला कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. त्यांनी केवळ तिला अप्रमाणिक म्हणत माध्यमं त्या अप्रमाणिक मुलीला पाठिंबा देत असल्याचं मत व्यक्त केलं.”
यावर न्यायालयाने संजय राऊत यांनी कंगनावर केलेल्या शेरेबाजीशी तुम्ही सहमत आहात का असं वकिलांना विचारलं. त्यावर आदिती यांनी आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगत त्यांनी केवळ कंगनाला अप्रामाणिक असल्याचं म्हटल्याचं नमूद केलं. कंगनावरील कारवाईत कायद्याचं उल्लंघन झालं का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता राऊत यांनी ‘क्या है कानून’ असा प्रतिप्रश्न केला होता. न्यायालयाने संजय राऊत यांच्या या ‘क्या है कानून’ या वाक्यावरही आक्षेप घेतला आणि राऊत यांच्या वकिलाला त्याचा अर्थ विचारला.
न्यायमूर्ती एस. जे. कथावल्ला म्हणाले, “कंगनाने जे काही मत व्यक्त केलं आहे त्याच्याशी आम्हीही सहमत नाही. मात्र, त्याचा अर्थ आपण तिचं घर पाडावं असा होत नाही. ही पद्धत आहे का? इथं आपण सर्वचजण महाराष्ट्रीयन आहोत आणि आपल्याला महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे. मात्र त्यावर प्रतिक्रिया देण्याची ही पद्धत नाही. तुमचे अशिल एक सामान्य नागरिक नाही, तर एक नेते आहेत.”
हेही वाचा :
शेतकऱ्यांची दहशतवाद्यांशी तुलना, कंगनाविरोधात तक्रार दाखल
पुलवामापेक्षा जास्त नागरिक तुम्ही भिवंडीत मारले, कंगनाचा ठाकरेंवर पुन्हा हल्ला
‘भरपाई तर सोडाच, पण निरर्थक याचिका करणाऱ्या कंगनाला दंड करा’, बीएमसी उच्च न्यायालयात आक्रमक
संबंधित व्हिडीओ :
Mumbai High Court criticize Sanjay Raut and BMC