मुंबई: भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांना (pravin darekar) हायकोर्टाने दिलासा दिला आहे. मुंबई बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी सत्र न्यायालयाने दरेकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात (high court) धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना दिलासा दिला आहे. त्यांना 50 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. दरेकरांविरोधातील हा एफआयआर चुकीचा होता. त्यात कोणतीही केस दिसून येत नव्हती. दरेकरांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी असं हे प्रकरण नव्हतं. कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. कोठडीत घेऊन अटक करण्यासारखी ही केस नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. सरकारने केवळ कस्टडी करता ही केस दाखल केली होती. पण कोर्टाने ती फेटाळून लावली आहे, असं दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे (akhilesh chaube) यांनी सांगितलं. याप्रकरणी कोर्टाने सरकारला जोरदार थप्पड लगावली आहे. कुणाचीही मनामानी खपवून घेतला जाणार नाही हेच यातून दिसून आल्याची प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
प्रवीण दरेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाने दरेकर यांना मोठा दिलासा दिला आहे. या निकालानंतर दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ही राजकीय हेतूने प्रेरित केस आहे. हे आम्ही सहा महिन्यापासून सांगत होतो. आज परत कोर्टाने केस होत नाही हे स्पष्ट केलं. या प्रकरणाचा तपास सुरू राहील. आम्ही पोलिसांना हवं तेव्हा सहकार्य करू, असं अखिलेश चौबे यांनी स्पष्ट केलं.
बोगस मजूर म्हणून गुन्हा दाखल केला. याबाबतचा मी एक जीआर आणला आहे. त्यानुसार प्रत्येक मेंबर सोसायटीत दोन मेंबर सदस्य होऊ शकतात. हा कायदा आहे. 1989 मध्ये हा जीआर काढला आहे. त्यावरून हा एफआयआर राजकीय हेतूने दाखल केल्याचं सिद्ध झालंय, असं सांगतानाच पोलीसांना तपासात रस नाही. त्यांनी दोन दिवस आम्हाला बसून ठेवलं होतं. आम्हीही भाजपच्या नेत्यांना अटक करतोय हे दाखवण्यासाठी त्यांना दरेकरांची कस्टडी हवी होती, असा दावा चौबे यांनी केला.
कोर्टाने दिलासा दिल्यानंतर प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आघाडी सरकारने राज्यात विरोधकांचा छळवाद मांडला आहे. त्याला चोख उत्तर न्यायालयाने दिलासा देऊन दिलं आहे. ज्या गोष्टीत तथ्य नव्हते. गुन्हाही होत नव्हता. पण जोरजबरदस्तीने गुन्हे दाखल केले होते. कुंभाड रचलं होतं. स्वत: सरकार त्यात हस्तक्षेप करत होते. मी स्वत: पाहत होतो. पण आपल्या देशात लोकशाही, संविधान मजबूत आहे. मनमानी करता येत नाही. कोर्टाने मनमानीला जोरदार थप्पड लगावली आहे. दरेकर यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न होता. पण जेवढे विरोध करतील तेवढे मी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणारच, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
आमदार नितेश राणे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय होणार होता. महाविकास आघाडी आल्यापासून यांना तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे. खोट्या केसेस भाजप नेत्यावर टाकायच्या आणि कोर्टात तोंडावर आपटायचं हे रोज झालं आहे. कोर्टाकडून यांच्यावर जे ताशेरे ओढले जातात त्यांना तोंड दाखवायला जागा राहत नाही. दरेकर पारदर्शक पद्धतीने बँक चालवत होते. पण या लोकांची खोटारडेपणाची सवय जात नाही. किरीट सोमय्या प्रकरणातही हेच होणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.
संबंधित बातम्या:
Anand Dave : ‘हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले’