मुंबई : मुंबईसह उपनगरात सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाचा फटका अनेक भागात बसला असून काही ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईतही सकाळपासून सतंतधार पडत असून पावसाने संध्याकाळापासून जोर धरला आहे. मुंबईतील काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वेध शाळेने वर्तवली आहे.
मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. सतंतधार सुरु असलेल्या पावसामुळे पाणी साचलं आहे. तर काही ठिकाणी वाहतूक मंदावली आहे. राजयगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार तर पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा होण्याची शक्यताही वेध शाळेकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी करुन प्रशासनालाही सतर्क राहण्याची आवाहन केले आहे.
मुंबई
मुंबईत आज संध्याकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि याचा फटका कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना बसला आहे. पावसामुळे ईस्टर्न फ्रीवेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईसह उपनगरात जोरात पाऊस पडत आहे त्याच बरोबर विजांचा कडकडाट होत आहे. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नवी मुंबई
नवी मुंबईतील सानपाडा सबवे, ऐरोली सबवे यासह रस्त्यावर पाणी साचलं आहे. सायन-पनवेल महामार्गावर नेरुळ येथे पुलाखाली पाणी साचल्यामुळे वाहनं धीम्या गतीने जात आहेत. बेलापूर उरण फाट्यापासून जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सध्या वाहतूक सुरळीत आहे. वाशी, ऐरोली, एपीएमसी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे.
कल्याण-डोंबिवली
कल्याण- डोंबिवलीमध्येही अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. डोंबिवलीतील मंदिरही पाण्याखाली गेल्यामुळे कमरेइतके पाणी साचलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे.
बदलापूर
बदलापूरमध्येही सकाळपासून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे बदलापूर रेल्वे स्टेशनच्या ट्रॅकवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक धिम्या गतीने चालत आहे.
वसई
वसईत अधून मधून पडणाऱ्या पावसाने हायटेन्शन विजेचा खांब कोसळला आहे. वसईच्या पापडी मराठा आळी येथे आज सायंकाळी 6 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र परिसरातील सर्वच वीज मात्र गुल झाली आहे.
रायगड
रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे. अंबा, सावित्री आणि कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर सावित्री नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.
रत्नागिरी
सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. संध्याकाळी 8:00 वाजल्यापासून जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच मुंबई – गोवा महामार्गही ठप्प झाला आहे.