किशोरी पेडणेकर यांची आज ईडीकडून चौकशी; कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी समन्स

| Updated on: Nov 08, 2023 | 11:34 AM

Kishori Pednekar ED Inquiry Summons : किशोरी पेडणेकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे. कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना समन्स पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी होणार आहे. चौकशीला जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

किशोरी पेडणेकर यांची आज ईडीकडून चौकशी; कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी समन्स
Follow us on

निवृत्ती बाबर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 08 नोव्हेंबर 2023 : मुंबईच्या माजी महापौर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे. किशोरी पेडणेकर या ईडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. किशोरी पेडणेकर या थोड्याच वेळात ईडीच्या कार्यलयात दाखल होतील. किशोरी पेडणेकर यांना आज चौकशी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आलं आहे. त्यानंतर आता आज त्यांची चौकशी केली जाईल. चौकशी यंत्रणात राजकारण घुसली आहे, असं म्हणत तपास यंत्रणांच्या तपास प्रक्रियेवर किशोरी पेडणेकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

पेडणेकर यांची प्रतिक्रिया काय?

किशोरी पेडणेकर या ईडी कार्यालयाकडे जाण्यासाठी निघाल्या. तेव्हा किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. आज ईडी कार्यालयात जात आहे. आज हजर राहण्याचं जे समन्स आहे. हा चौकशीचा भाग आहे. त्यांना सहकार्य करणं आपलं काम आहे. मुंबईकरांसाठी आम्ही चांगलं काम केलं आहे. हिशोब सर्वांना द्यावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगेन मी काहीही केलेलं नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी यांनी आरोप फेटाळले आहेत. चौकशी यंत्रणात राजकारण घुसली आहे, असं म्हणत तपास यंत्रणांच्या तपास प्रक्रियेवर पेडणेकर यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे.

कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरण काय आहे?

डेड बॉडी किट बॅग हे अवाजवी दरात विकत घेतले, असा आरोप ठेवण्यात आला आहे. 1 हजार 300 रुपये किंमत असणारी बॉडीबॅग 6800 रुपयाला विकत घेण्यात आल्याचा आरोप आहे. किशोरी पेडणेकर यांच्यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू, परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर आणि वेदांत इन्फो लिमिटेड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची आज चौकशी होत आहे.

शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली आहे. कचोरी ताई दिवाळीच्या चकल्या यंदा जेलमध्येच खाणार वाटतं… दिवा पण फडफडून विझणार वाटतं!, अशा शब्दात म्हात्रे यांनी पेडणेकरांवर टीका केली आहे.

शीतल म्हात्रे यांच्या या टीकेला पेडणेकर यांनी उत्तर दिलं आहे. भान हरपलेली बाई आहे ती… सत्य काय आहे ते बघावं, असं पेडणेकर म्हणाल्या. शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर पक्ष निष्ठेची चकली बनवेन पण त्याच्यासाठी लागणारा दांडा कुठे आहे .मेलेल्या सासऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाऊन खोटी सही घेऊन बसली आहेस त्याचं काय????, असं ट्विटही किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.