मुंबईतील कुर्ला भागात काल भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण जखमी झाले आहेत. कुर्ला स्टेशन परिसरात बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आहे. 25 ते 30 वाहनांना धडक दिली आहेत. काही नागरिकांना चिरडलं देखील आहे. यापैकी दोन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. जखमींना जवळच्याच भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आतापर्यंत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 25 ते 30 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.दोन तासांनी क्रेनच्या साह्याने बस बाहेर काढण्यात आली आहे. बसचा स्पीड देखील अधिक असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर बसच्या काचा देखील फुटलेल्या आहेत.
सध्या बस ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. ही बस 332 होती कुर्ल्यापासून अंधेरीला जात होती. हा अपघात कुर्ल्यात घडला आहे. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात भरधाव वेगात बस लोकांना चिरडताना दिसत आहे. रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या लोकांना या बसने धडक दिल्याचं दिसत आहे. अंगावर काटा आणणारी ही सगळी दृश्ये सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहेत.
कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातात आता पर्यंत मृतांचा आकडा 5 झाला आहे. तर जखमी 26 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विजय विष्णू गायकवाड(७०), आफ्रीन अब्दुल सलीम शहा(१९), अनम शेख(२०), कणीस फातिमा गुलाम कादरी(५५), शिवम कश्यप(१८) अशी मृतांची नावे आहेत.
जेव्हा हा अपघात घडला तेव्हा अपघातग्रस्त बसमध्ये तब्बल ६० प्रवासी असल्याचे पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी बस चालक संजय मोरे(५४) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली गेली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलिस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. यातील पीएसआय प्रशांत चव्हाण या जखमी अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई कुर्ला पोलीस करीत आहे.
कुर्ल्यातील कालच्या भीषण अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद ठेवण्यात आलं आहे. कालच्या घटनेनंतर कुठलाही अनुश्चित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. बेस्ट बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. चालत किंवा रिक्षाने इप्सितस्थळी पोहचावं लागत आहे.