मुंबई : सलग दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर (Mumbai Rains) मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण, भिवंडी परिसरात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाचं पाणी साचल्यामुळे विस्कळीत झालेली मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा (Central Railway, Western Railway and Harbour Railway) हळूहळू पूर्वपदावर आली आहे. मात्र पुढील 48 तास मुंबईकरांसाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
पश्चिम रेल्वेवरील जलद आणि धीम्या मार्गावरील दोन्ही दिशेची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूकही पूर्वपदावर आली असली, तरी सकाळच्या सुमारास 20 ते 25 मिनिटे उशिराने सुरु आहे. मात्र पावसाने झालेल्या खोळंब्यामुळे उशिरा घरी पोहचलेल्या मुंबईकरांनी गुरुवारच्या दिवशी उशिरा ऑफिसला जाण्याचा किंवा दांडी मारण्याचा बेत आखल्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी आहे.
मध्य रेल्वेवर अंबरनाथच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी रवाना झाली. तर हार्बर रेल्वेवर सीएसएमटी ते अंधेरी मार्गावरील लोकल सकाळी 5 वाजून 22 मिनिटांनी निघाली. सीएसएमटीहून सकाळी सहा वाजता लोकल रवाना झाली.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरारदरम्यान जलद आणि धीम्या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. धीम्या मार्गावरील वाहतूक बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून सुरु झाली होती.
मुंबईतील हिंदमाता, सायन, वांद्रे, किंग्ज सर्कल यासारख्या भागात साचलेलं पाणी ओसरलं आहे. पावसाने उघडीप घेतल्यामुळे साचलेलं पाणी वेगाने ओसरलं. त्यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूकही आता पूर्वपदावर आलेली आहे.
मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरातील बहुतांश शाळांना गणेशोत्सवानिमित्त सुट्टी होतीच, मात्र जी शाळा-कॉलेजेस सुरु होती, तीसुद्धा आज (गुरुवार 5 सप्टेंबर) बंद ठेवण्याची घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.
In view of heavy rains today & rainfall forecasts. As a precautionary measure, holiday is declared for all schools & junior colleges in Mumbai, Thane & Kokan region tommorrow 5 Sep 2019. District collectors in other parts of Maharashtra to decide, based on local conditions.
— ashish shelar (@ShelarAshish) September 4, 2019
हवामान विभागाने पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावं, अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि सुरक्षित स्थळी थांबा, अशी विनंती मुंबई पोलिसांनी नागरिकांना केली आहे. मदत लागल्यास ट्वीट किंवा 100 नंबरवर संपर्क करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी अधूनमधून अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहर हवामानाचा अंदाज (आय.एम.डी) तर्फे ०८:०० वाजता -शहर व उपनगरात काही ठिकाणी अधनू मधनू अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता.@IMDWeather
#Monsoon2019 #MCGMUpdates #MumbaiRains #SafeMonsoon pic.twitter.com/nEEecVHUYc— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 5, 2019