मुंबई : मुंबई आणि आसपासच्या पट्टयात मागच्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसामुळे मुंबईकर आधीच हैराण असताना आता मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा कोलमडली आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. अगदी कसारा, आसनगावमधून मोठ्या संख्येने प्रवासी मुंबईत येतात.
आज ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांचे हाल होत आहेत. पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही.
प्रवाशांची मोठी गर्दी
आटगाव रेल्वे स्थानकात मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळे कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल आसनगाव स्थानकात रद्द झाल्या आहेत. त्यामुळे नोकरीसाठी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. आसनगाव आणि त्यापुढच्या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे.
कुठल्या लोकलला सर्व स्थानकात थांबा?
मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होऊ नये, यासाठी जनता एक्सप्रेसला कसारा ते कल्याणपर्यंत सर्व स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. आसानगाव-कसारा पट्ट्यातून नोकरीसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक ये-जा करतात. एकतर या भागात लोकलची संख्या कमी आहे. त्यामुळे नोकरीच ठिकाण गाठण्यासाठी वेळेवर निघाव लागतं. त्यात रेल्वे वाहतूक कोलमडल्यास नागरिकांचे हाल होतात.