विनायक डावरुंग, मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेच्या लोकल (Mumbai Local News) मार्गावरील दादर रेल्वे (Dadar Railway Station) स्थानकात गुरुवारी सकाळी तांत्रिक बिघाड झाला. मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे बराच वेळ एक एक्स्प्रेस दादर स्थानकातच खोळंबली. सिग्नल यंत्रणेतील बिघाडाचा फटका मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वेळापत्रकावर झाल्याचं पाहायला मिळालं. दादरहून सीएसएमटीच्या (Dadar-CSMT) दिशेने जाणारी वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली. अखेर मध्य रेल्वेच्या प्रशासनानं तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. आता हा बिघाड दुरुस्त करण्यात आलाय. मात्र बिघाड दुरुस्त होईपर्यंत जलद मार्गावर लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांची एकामागून एक रांग लागल्याचं चित्र पाहायला मिळालं.
दादर रेल्वे स्थानकातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्य पीआरओ शिवाजी सुतार यांनी सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी दिली होती. त्यानंतर तातडीने रेल्वे प्रशासनाचं पथक हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी कामाला लागलं. अथक प्रयत्नांनी अखेर हा बिघाड दुरुस्त करण्यात आलाय.
दादार रेल्वे स्थानकात झालेल्या बिघाडामुळे एक एक्स्प्रेस सीएसएमटी रेल्वे स्थानकात बराच वेळ थांबून होती. या एक्स्प्रेस मागेच लोकलही हाकेच्या अंतरावर थांबल्याचं दिसून येत होतं. हीच स्थिती सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर पाहायला मिळाली. एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या एका मागोमाग एक खोळंबल्या होत्या.
आता दादर-सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. मात्र तांत्रिक बिघाडाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसलाय. जलद मार्गाने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वाहतूक विस्कळीत झाल्यानं नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय. सीएसएमटीच्या दिशेने जलद गतीने धावणाऱ्या गाड्या या उशिराने धावत आहेत. त्यामुळे दादर स्थानकातील बिघाडाचा फटका जलद मार्गावरील सर्वच रेल्वे स्थानकांना बसलाय.
जलद मार्गावरील रेल्वे स्थानकं असलेल्या ठाणे, कुर्ला, घाटकोपर, डोंबिवली, इत्यादी रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. या तांत्रिक बिघाडामुळे कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचाही खोळंबा झाला. मध्य रेल्वेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका अनेकांना बसल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, आता वाहतूक पुन्हा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहेत.