Mumbai Local Today MegaBlock : संपूर्ण मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज रविवार असल्याने अनेक मुंबईकर हे फिरण्याचा, शॉपिंग करण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हीही आज अशाच प्रकारे फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर मुंबई लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. कारण आज मुंबईच्या तिन्हीही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज मुंबईच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री, तर मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळपासूनच हा मेगाब्लॉक असेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मेगाब्लॉकदरम्यान अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे आज घराबाहेर पडल्यानंतर गैरसोय टाळायची असेल तर मुंबई लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
आज रविवार 8 डिसेंबर रोजी मेगाब्लॉकमुळे माटुंगा-मुलुंड जलद मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हार्बर मार्गावरील सेवा रद्द असतील. या काळात पनवेल – कुर्ला या दरम्यान विशेष सेवा सुरू राहतील. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.
रविवारी मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत चार तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. तसेच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगापासून पुढे धिम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. तर माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या गाड्या साधारण 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. त्यानंतर ठाण्याहून पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाण्यातून सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 या वेळेत सुटणाऱ्या अप-जलद मार्गावरील गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर मार्गावर सीएसएमटीवरून सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलमधून सुटणाऱ्या सेवा रद्द असतील. तर सीएसएमटीवरून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे आणि गोरेगावसाठी सुटणाऱ्या सेवा रद्द असणार आहेत. तसेच पनवेल / बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत रद्द असणार आहेत. तसेच गोरेगाव/वांद्रे या स्थानकातून सीएसटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत रद्द राहतील.