Mumbai Local Update : गेल्या काही वर्षांपासून मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सातत्याने कोलमडत आहे. तर काही वेळा तांत्रिक बिघाडामुळे लोकल ठप्प होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आज सकाळी ऐन कामाला जाण्याच्या वेळी मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मध्य रेल्वेची सेवा ठप्प झाली होती. मध्य रेल्वेच्या आसनगाव स्थानकामधील विद्युत पॅनलमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे आसनगाववरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवरुन आसनगावाकडे जाणाऱ्या लोकल गाड्या काही काळ बंद झाल्या होत्या. यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल झाले.
Kindly look into it. @srdomcogbbcr
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) January 16, 2025
आसनगाववरुन लांब पल्ल्यांच्या गाड्यांनाही इंजिन लावून नेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यानंतर तात्काळ हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला आणि लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई लोकल पुन्हा सुरळीत झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिसमध्ये पोहोचतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढलं आहे. त्यात उशिरा येणाऱ्या ट्रेन, मर्यादित लोकल, लोकल डब्ब्यांची संख्या आणि सातत्याने होणारे तांत्रिक बिघाड यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा सतत खोळंबा होतो. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. दररोज मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र अद्याप यावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही.