Mumbai Local Train Update : ऐन दिवाळीच्या सणादरम्यान मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता सणासुदीच्या दिवसात मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवरील सर्व लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. सीएसएमटी-हावडा गीतांजली एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे गीतांजली एक्सप्रेस ही कल्याण स्थानकात थांबवण्यात आली आहे. या एक्सप्रेसमुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
Train No. 12859 Geetanjali Exp technical issue has been resolved now and Train departed from Kalyan at 09:00hrs
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) October 30, 2024
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकात सकाळी ७ च्या सुमारास गितांजली एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे ही एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबवण्यात आली होती. यामुळे मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा विस्कळीत झाली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले असून मध्य रेल्वे सध्या सुरळीत सुरु आहे.
दरम्यान मध्य रेल्वे ही उशिराने धावत असल्याची तक्रार सातत्याने प्रवाशांकडून केली जात आहे. मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक कायमच कोलमडले असल्याचे पाहायला मिळते. कर्जत, कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या व जलद मार्गावरील लोकल सेवा अनेकदा विस्कळीत असतात. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते.
सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही गर्दी झाली होती.