मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

| Updated on: Oct 08, 2024 | 8:37 AM

मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने दोन्हीही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दिवा-कोपर दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
Follow us on

Mumbai Local Running Late : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाला जाण्याच्या वेळेस मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेवरील दिवा आणि कोपरदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या मध्य रेल्वे ही 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक सकाळपासूनच विस्कळीत झाली आहे. दिवा आणि कोपर या स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाण्याहून कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. यामुळे स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. सध्या मध्य रेल्वेची वाहतूक ही 5 ते 10 मिनिटे उशिराने सुरु आहेत.

लोकल 15-20 मिनिटे उशिराने

मध्य रेल्वेची लोकल सेवा दिवा-कोपर दरम्यान रात्री 03:10 वाजता ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) तुटल्यामुळे ठप्प झाली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर या ओव्हरहेड वायरची तातडीने दुरुस्ती केली. ही दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वेची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली. यानंतर आज मंगळवारी पहाटे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सवरुन कल्याणकडे येणाऱ्या लोकल 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सध्या रेल्वे प्रशासनाकडून खोळंबलेले वेळापत्रक रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

दरम्यान मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.