मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर काही तांत्रिक कारणामुळे सध्या लोकल वाहतूक उशिराने धावत आहे. त्यामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेला मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. त्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेची वाहतूक आज पहाटेपासूनच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सकडे जाणाऱ्या लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. धुकं, लांब पल्ल्याच्या गाड्या आणि तांत्रिक कारणांमुळे कसारा-कर्जतहून कल्याणकडे येणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. परिणामी कसारा-कर्जतहून सीएसएमटी आणि कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांवर परिणाम झाला आहे.
यामुळे कल्याण-सीएसएमटीकडे जाणारी स्लो आणि फास्ट या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे सध्या मध्य रेल्वेच्या कल्याण, डोंबिवली, दिवा, ठाणे या स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ऐन सकाळी कामाला जाण्याच्या वेळेस मोठा गोंधळ झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. कर्जत, कसारा, अंबरनाथ, डोंबिवली, कल्याण यांसह अनेक स्थानकावर पहाटेच्या वेळेला कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिसमध्ये पोहोचतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.