पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, वेगही मंदावणार; कारण….

| Updated on: Sep 30, 2024 | 1:05 PM

सकाळच्या वेळी गोरेगाव स्थानकातून सुटणाऱ्या चार जलद लोकल रद्द केल्या जातील. तर मालाड स्थानकात ब्लॉकच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालेलं आहे

पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, वेगही मंदावणार; कारण....
Follow us on

Western Railway Service Affected : मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलमधून लाखो लोक दररोज प्रवास करतात. पण पश्चिम रेल्वे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी आज सोमवारी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे आज सोमवारी रात्री 12.30 ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक काळात 150 ते 175 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनचा विस्तार केला जाणार आहे. हे काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून आज रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत 150 लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच राम मंदिर स्टेशन ते मालाड दरम्यान लोकल प्रतितास 30 किमी वेगाने चालवल्या जातील. यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक काहीसे कोलमडलेले पाहायला मिळेल.

मालाड स्थानकापर्यंत सहाव्या लाईनचा विस्ताराचे 128 तासांचं काम अद्याप बाकी आहे. यातील सहाव्या लाईनचं काम जसं जसं पूर्ण होईल, तशी तशी वेगावरील मर्यादा हटवण्यात येईल. यामुळे सकाळच्या वेळी गोरेगाव स्थानकातून सुटणाऱ्या चार जलद लोकल रद्द केल्या जातील. तर मालाड स्थानकात ब्लॉकच्या वेळी कट अँड कनेक्शनचं काम झालेलं आहे. त्यामुळे मालाड स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 हा प्लॅटफॉर्म क्रमांक 4 म्हणून ओळखला जाईल.

पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते कांदिवली स्टेशनदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सुरु आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावर ब्लॉक असणार आहे. यामुळे गोरेगाव अप आणि डाऊन फास्ट लाईन आणि मालाड अप आणि डाऊन फास्ट ट्रॅक आणि स्लो ट्रॅकवर ब्लॉक घेतला जाईल. सोमवारी रात्री 12.30 ते मंगळवारी पहाटे 4.30 पर्यंत म्हणजेच चार तासांचा ब्लॉक घेतला जाईल. पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, या कालावधीत लोकल चर्चगेट ते अंधेरी आणि विरार ते बोरिवलीपर्यंत चालवल्या जातील. या काळात मेल आणि एक्स्प्रेस गाड्या 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.

आज शेवटच्या लोकलचं वेळापत्रक असं असणार?

चर्चगेट-विरार लोकल : चर्चगेटहून शेवटची लोकल रात्री 11.27 वाजता सुटेल. ती विरारला 1.15 वाजता पोहोचेल.

चर्चगेट-अंधेरी लोकल – चर्चगेटहून अंधेरीसाठी लोकल 1.00 वाजता सुटेल ती 1.35 वाजता अंधेरीला पोहोचेल.

बोरिवली- चर्चगेट लोकल – बोरिवलीहून लोकल 00.10 वाजता सुटेल ती 01.15 ला चर्चगेटला पोहोचेल.

गोरेगाव-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरेगावहून 00.07 ला लोकल सुटेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 1.02 ला पोहोचेल.

विरार-बोरिवली लोकल – ही अतिरिक्त लोकल चालवली जाईल. विरारवरुन 03.25 ला सुटेल ती बोरिवलीत 4.00 वाजता पोहोचेल.

बोरिवली-चर्चगेट धिमी लोकल – अतिरिक्त लोकल बोरिवलीवरुन 04.25 सुटेल ती चर्चगेटला 05.30 वाजता पोहोचेल.

सहाव्या मार्गिकेचा फायदा काय?

सहाव्या लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर मेल एक्सप्रेसला स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. त्यामुळे लोकलची संख्या वाढवण्याचा मार्गही मोकळा होईल. पश्चिम रेल्वेच्या नियोजनानुसार सहावी लाईन डिसेंबर 2024 पर्यंत बोरिवलीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे चर्चगेट ते बोरिवलीपर्यंत लोकल सेवेमध्ये सुधारणा होईल.