नववर्षाच्या सुरुवातीला मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली, पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रवाशी संतप्त

| Updated on: Jan 03, 2025 | 10:38 AM

पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्या यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

नववर्षाच्या सुरुवातीला मुंबई लोकलची वाहतूक कोलमडली, पश्चिम रेल्वे विस्कळीत, प्रवाशी संतप्त
Follow us on

Mumbai Local Train Update : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलची सेवा कोलमडली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील अनेक लोकल, एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक लोकल उशिराने धावत आहेत. या कारणाने प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 20-25 दिवसांपासून मुंबईतील पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूक उशिराने धावत आहे. पश्चिम रेल्वेवर काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे प्रवाशी संतप्त झाले आहेत. अनेक प्रवाशांनी याबद्दल ट्वीटरवर तक्रार नोंदवली आहे. यावर रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

प्रवाशी संतप्त

पश्चिम रेल्वेवरील विरार, वसई, भाईंदर या ठिकाणच्या गाड्या नेहमी सकाळी 15-20 मिनिटे उशिरा का धावतात. विशेषत: एसी लोकल या अनेकदा उशीरा असतात. काही दिवस लोकल उशीरा असल्या तर समजू शकते, पण नियमितपणे लोकल उशिराने धावत आहेत. यावर कोणी उत्तर देईल का? असा प्रश्न एका प्रवाशाने विचारला आहे. त्यावर पश्चिम रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.

प्रिय प्रवाशांनो, आम्ही कायमच रेल्वे लोकल मूळ स्थानकावरुन वेळेत सोडण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र दरम्यानच्या स्थानकावर काही मिनिटांसाठी उशीर होऊ शकतो. काहीवेळा आत्महत्या, अलार्म, चैन खेचणे, रेल्वे ट्रॅकवर गुरेढोरे धावणे यासारख्या समस्या निर्माण होतात. तसेच एकाच रेल्वे मार्गावर लोकल गाड्या, एक्सप्रेस धावत असतात. त्यामुळे रेल्वे उशिराने धावत असतात. तरी सध्या ट्रेन वेळेवर आणण्यासाठी एक गट 24 तास काम करत आहेत. याबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहेत, असे पश्चिम रेल्वेने सांगितले आहे.

प्रवाशांचा मोठा खोळंबा

दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तांत्रिक गोंधळामुळे अनेक लोकल गाड्या या उशिराने धावत आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला लेटमार्क लागला आहे. रेल्वेच्या नियोजनामुळे प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनेक प्रवाशी संतप्त झाले आहेत.