मुंबई : मुंबईत मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मागच्या दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर जास्त वाढलाय. काल मुंबईला रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मुंबईत आजही कोसळधार कायम आहे. मुंबईत काल ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे मुंबईच्या वेगाला ब्रेक लागला. मुंबई आणि उपनगराला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसाचा फटका मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला बसतोय. मुंबईत वाहतुकीचा वेग आधीच मंदावला आहे. महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची गती मंदावली आहे.
लोकल सेवेला फटका
रेल्वे म्हणजे लोकल सेवा मुंबईची जीवनवाहिनी म्हटली जाते. दररोज लाखो लोक मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन प्रवास करतात. अगदी कसारा, डहाणूपासून दररोज नोकरीसाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. त्यामुळे मुंबईचा वेग मोठ्या प्रमाणात लोकल सेवेवर अवलंबून आहे. आता सतत सुरु असलेल्या पावसाचा या लोकल सेवेला फटका बसला आहे.
किती मिनिट उशिराने धावतायत लोकल?
मुंबईत गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेला पाऊस शुक्रवारी सकाळी कायम आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल 8 ते 10 मिनिट उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक 12 ते 15 मिनिट उशिराने धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर ट्रेन 15 ते 20 मिनिट उशिराने धावत आहेत. ट्रान्स हार्बरमार्गावर लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावतायत.
पश्चिम रेल्वे मार्गावर ट्रेन उशिराने का?
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट रेल्वे स्थानकावर सकाळी पॉईंट बिघाड झाला होता. त्यामुळे पश्चिम रेल्वेची लोकल 5 मिनिटे उशिराने धावत होती, पण सध्या पॉइंट बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पॉईंट फेलियर दुरुस्त करण्यात आला आहे, लवकरच ट्रेन वेळेवर धावण्यास सुरुवात होईल.
लेट मार्कचा सामना
रेल्वे प्रवाशांना सततच्या सुरु असलेल्या पावसाचा मोठा फटका बसतोय. उशिरा लोकल सुरू असल्याने ऑफिसला पोहोचणाऱ्या नोकरदारांना लेट मार्कचा सामना करावा लागत आहे.