मुंबई : मुंबईत कोरोना पुन्हा डोकं वर काढण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी नव्याने निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सुरु झाल्यापासून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांविरोधात रेल्वेतही कारवाई होणार आहे. लोकलमध्ये मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष मार्शल नेमून महापालिका कारवाई करणार आहे. (Mumbai Local Without Mask passengers action in railway)
विशेष मार्शल नेमून प्रवाशांवर कारवाई
मुंबईतील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवास खुला झाल्यानंतर गर्दी वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संक्रमण वाढण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्याला वेळीच आवर घालण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने नव्याने आढावा सुरु केला आहे. मुंबई महापालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
त्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख, टास्क फोर्सचे सदस्य आदींशी संवाद साधला. त्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपायांचा आढावा घेण्यात आला.
15 लाख मुंबईकरांवर कारवाई
या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल प्रवासात अनेक प्रवाशांकडून मास्क वापरला जात नसल्यास त्यांच्यावर कारवाईसाठी पालिकेने कठोर पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी लोकलमध्ये मार्शल नियुक्त केले जाणार आहेत. आतापर्यंत 15 लाख मुंबईकरांवर मास्क न वापरल्याबद्दल कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून 30 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मुंबईतील चार भागात वाढती रुग्णसंख्या
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही मुंबईतील के ईस्ट (अंधेरीपूर्व जोगेश्वरी), टी वॉर्ड (मुलुंड), आर सेंट्रल (बोरिवली), एम वेस्ट (चेंबूर, टिळक नगर) या भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं सांगितलं. हे चारही वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. मुंबईत दररोज कोरोना रुग्णांची संख्या 10 ते 15 टक्क्याने वाढत असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. (Mumbai Local Without Mask passengers action in railway)
कुठे किती रुग्णसंख्या?
चेंबूर, टिळक नगर आणि मुलुंड भागात रुग्णसंख्यावाढीचा दर सर्वाधिक- 0.26% एवढी आहे. अंधेरी, जोगेश्वरीमध्ये 334, मुलुंडमध्ये 289, बोरिवलीत 402 आणि टिळक नगर, चेंबूरमध्ये 172 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
इमारतींमध्ये सर्वाधिक रुग्ण
इमारतींमध्ये 98 टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. एम पश्चिम वॉर्डात 550 इमारतींना नोटिसा पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या नोटिशीद्वारे रहिवााश्यांना कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
मुंबईतल्या चार वॉर्डात कोरोना रुग्णसंख्या वाढली, इमारतींना नोटीसा; पालिका अॅक्शन मोडमध्ये!
(Mumbai Local Without Mask passengers action in railway)