मुंबई | ओडीशामधील बालासोर इथे 3 ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुरांतो आणि कोरोमंडल या 2 एक्सप्रेस गाड्या मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 350 पेक्षा अधिक जणांना दुखापत झाली आहे. दुखापतग्रस्त आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी युद्ध पातळीवर बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव घटनास्थळी निघाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबाबत ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. दरम्यान या अपघातामुळे शनिवारी 3 जून रोजी होणारा वंदे भारत एक्सप्रेस लोकार्पणाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शनिवारी 3 जून रोजी मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होता. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. पंतप्रधान मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते.
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी वंदेभारत एक्सप्रेसचं स्वागत करणार होते. यासाठी सर्व तयारी झाली होती. मात्र ओडीशात झालेल्या भीषण अपघातामुळे हा उद्घाटन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम तुर्तास रद्द करण्यात आला आहे. आता हा उद्घाटन कार्यक्रम पुन्हा केव्हा होणार, याबाबतची अपडेट अजून देण्यात आलेली नाही.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस एसी चेअरसाठी 1 हजार 100 रुपये ते 1 हजार 600 रुपये मोजावे लागतील. तर एक्झिक्युटिव्ह चेअरकारसाठी 2 हजार ते 2 हजार 800 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला एकूण 8 डब्बे असणार आहेत. ही एक्सप्रेस इतर वंदे भारतप्रमाणे दिवसाच धावणार आहे. शुक्रवारचा अपवाद वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सकाळी 5 वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटी इथून सुटेल. तर गोव्यातील मडगाव इथे दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी पोहचेल.
तर वंदे भारत एक्सप्रेस गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी सुटेल, तर सीएसएमटीला रात्री 10 वाजून 25 मिनिटांनी पोहचेल. या वंदे भारतच्या उद्घाटनसाठी कोकणवासीय फार उत्सूक होते. मात्र ओडीशात झालेल्या अपघातामुळे दुर्देवाने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे आता पुन्हा लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, याकडे लक्ष असणार आहे.