विनायक डावरुंग , प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 10 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे आक्रमक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. राऊत त्यांच्या खास शैलीत विरोधकांवर टीकास्त्र डागतात. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी या निकालाचं वाचन करतील. या निकालाच्या काही तास आधी संजय राऊत यांनी सर्वात गंभीर आरोप केला. या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आधीच ठरला आहे. मॅच फिक्सिंग झालं आहे, असा दावा संजय राऊतांनी केला. त्यांच्या या गंभीर आरोपांना स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर नार्वेकरांनी पलटवार केला आहे.
संजय राऊत काहीही बोलत असतात. उद्या ते म्हणतील की, निकाल अमेरिकेतून आणलाय. त्यांच्या बोलण्याला काही अर्थ असतो का? संजय राऊत यांच्यासारख्या लोकांना इग्नोर करणंच बेस्ट आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
आज दिल्या जाणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल आहे. या निकालआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. आमदार अपात्रता प्रकरणी आज निकाल दिला जाईल. आजचा हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल. संविधानात ज्या तरतुदी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आदेशात जे प्रिन्सिपल सेट केले आहेत. त्यावर आधारित हा निर्णय असेल. या निकालातून सर्वांना न्याय मिळेल, असं राहुल नार्वेकर म्हणाले.
आजच्या या निर्णयातून 10th शेड्युलमध्ये ज्या बाबींचं इंटरप्रिटेशन झालं नव्हतं. त्या अत्यंत मूलभूत आणि बेंचमार्क असा निर्णय असेल. या निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. इतकं मी जनतेला आश्वासित करतो. मी सांगितल्याप्रमाणे कायद्याचं तंतोतंत पालन केलं जाईल. हा निकाल जनतेलाही मान्य असेल, असं नार्वेकर म्हणाले.