मुंबई | 07 ऑफिस 2023 : गोविंदा रे गोपाळा… यशोदेच्या तान्ह्या बाळा… असा मुंबईसह महाराष्ट्र जयघोष ठिकठिकाणी ऐकायला मिळतोय. कारण आज आहे दहीहंडी उत्सव. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. थरावर थर लावत दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दहीहंडी पथकांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारही हजेरी लावणार आहेत. बॉलिवूडमधील तसंच मराठी कलाकारही ठिकठिकाणी हजेरी लावत आहेत. डान्सर गौतमी पाटीलही हजरी लावणार आहे. दहीकाल्याच्या उत्सवाचे खास क्षण… पाहा व्हीडिओ…
भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाच्या तायरीला सुरूवात झाली आहे. प्रतिकात्मक हंडी इथे फोडली जाणार आहे. काही वेळात उदय सामंतही या ठिकाणी येणार आहेत. राम कदम यांची उपनगरातील आणि भारतातील सगळ्यात मोठी दहीहंडी आहे. जवळपास 60 मंडळांची नोंद झाली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गोविंदांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे.
तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे तर्फे आयोजित मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सववाची सुरुवात झाली आहे.तारामती चॅरिटेबल फाउंडेशन आणि आमदार प्रकाश सुर्वे आयोजित मागाठाणे भव्य दहीकाला महोत्सव मध्ये गौतमी पाटील, करिश्मा कपूर, बिपाशा बसू यांच्यासह अनेक मराठी हिंदी चित्रपट अभिनेते-अभिनेत्री येणार आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दहीदंडीसाठी येणार आहेत. या नेत्यांचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. मागठाण्यात दरवर्षी दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावर्षीही या ठिकाणी मोठ्या उत्साहात सण जाणारा केला जात आहे.
आज मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. उल्हासनगरमध्ये मनसेच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलं. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडली. ही भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडत सरकारचा निषेध करण्यात आला.
कल्याण शिवाजी चौकात शिंदे गटाची तर काही अंतरावर ठाकरे गटाकडून दहीहंडी साजरी केली जात आहे. कल्याण शहरातील वर्दळीच्या चौकांत दोन्ही पक्षाची दहीहंडी साजरी होत असल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिळफाटा रस्त्याने पत्रीपूल मार्गे शिवाजी चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक पोलिसांनी पत्रीपूलावर प्रवेश बंदी केली आहे. तर पत्रीपूल येथे डावे वळण घेऊन गोविंदवाडीवरून वाहतूक वळवली गेली आहे.