गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी… मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचं याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 आरक्षण मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. मराठा समाजाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने जे सर्वेक्षण केलं. त्याबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने अहवाल तयार केला आहे. या अहवालात 10 टक्के आरक्षण देण्याचा उल्लेख आहे. या अहवालाचा मसुदा टीव्ही 9 मराठीवर एक्सक्लुझिव्ह तुम्ही पाहत आहात.
मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेल्या मसुद्यात महत्वाच्या बाबी जाणून घेऊयात… या मसुद्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्या मागास असल्याचा या मसुद्यात उल्लेख आहे. राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार आहे. राज्यातील शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आरक्षण मिळणार आहे.
मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा राज्य मागासवर्गाच्या मसुद्यात उल्लेख आहे. मराठा समाजातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी स्वतंत्रपणे आरक्षण राखून ठेवलं आहे. 80 टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असल्याचा या मसुद्यात उल्लेख आहे. राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के आहे. राज्य सरकारी नोकरी आणि शिक्षण संस्थांच्या प्रवेशासाठी आरक्षण देण्यात येणार आहे.
मराठा आरक्षणासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थित होते. तर चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, सुरेश खाडे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, संदिपान भुमरे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, छगन भुजबळ, दादा भुसे हे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाने तयार केलेला अहवाल मांडला गेला. मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल?, यावर चर्चा झाली.