आज, उद्या, परवा… तीन दिवस ईडी चौकशीचे; महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची चौकशी

| Updated on: Jan 23, 2024 | 10:51 AM

Mahavikas Aghadi Leader Ravindra Waikar Kishori Pednekar Rohit Pawar ED Inquiry : महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आह. आमदार रोहित पवार यांच्या चौकशीवेळी शरद पवार नेमके कुठे असणार? तीन नेते नेमके कोण आहेत? वाचा सविस्तर...

आज, उद्या, परवा... तीन दिवस ईडी चौकशीचे; महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांची चौकशी
Follow us on

मुंबई | 23 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशात विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला दिसतोय. पुढच्या तीन दिवसात महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर, ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. आज, उद्या आणि परवा या नेत्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते ईडीच्या रडारवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

वायकरांची आज ईडी चौकशी

ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार आहे. आज सकाळी 11 वाजता मुंबईत ईडी कार्यालयामध्ये त्यांची चौकशी केली जाणार आहेत. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकर यांची आज चौकशी होणार आहे. रवींद्र वायकर वर ईडी कडून मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.रवींद्र वायरांवर बनावट कागदपत्र बनवण्याचा ईडीचा कडून आरोप आहे. त्यामुळे आज रवींद्र वायकर ईडीकडे चौकशीसाठी जाणार की नाही हे पाहावं लागेल.

रोहित पवारांची उद्या चौकशी

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीवेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यालयात असणार आहेत. राष्ट्रवादीचं हे कार्यालय ईडीच्या कार्यालयापासून केवळ हाकेच्या अंतरावर आहे. याच कार्यालयात शरद पवार असणार आहेत. रोहित पवार यांचे समर्थकही राष्ट्रावदीच्या कार्यालया जवळ जमणार आहेत. त्यामुळे आता या चौकशी दरम्यान काय घडतं हे पाहणं महत्वाचं असेल.

किशोरी पेडणेकरांची परवा चौकशी

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची परवा ईडी चौकशी होणार आहे. या चौकशीवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मुळात मला असं वाटत ईडी आपल्या ऑफिसमध्ये बसतेय की कुणाच्या घरी? कोव्हिड घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कुठलाही गुन्हा केला नाही नीच पद्धतीचा मी गुन्हा केलेला नाही. माझ्यापर्यंत अजून नोटीस पोहचली नाही. आली तर मी चौकशीला नक्की जाईल मात्र मला अजून नोटीस आली नाही, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.