विनायक डावरूंग, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 17 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. काहीच महिन्यात देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले. अशात जागावाटपाचा मुद्दा चर्चेत आहे. महायुतीचं जागावाटप कसं होणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच मुंबईतील 6 जागांसाठीचा महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. 6 पैकी 4 जागांवर भाजप उमेदवार रिंगणार उतरणार असल्याची माहिती आहे. तर 2 जागांवर शिवसेना लढणार असल्याचं कळतं आहे. शिवसेना आणि भाजप पूर्ण ताकदीने या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. तसंच महायुतीच्या उमेदवारांना निवडणूक आणण्यासाठी तयारीही सुरु केल्याची माहिती आहे.
भाजपकडून 4 लोकसभा मतदार संघातून उमेदवार उतरवण्याचे प्रयत्न आहेत. लोकसभेसाठी भाजप 4 तर शिवसेना 2 जागांवर लढणार असल्याची माहिती आहे. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसह दक्षिण मुंबईची जागाही भाजप लढवणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभेबाबत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. दक्षिण मुंबई बाबत पेच कायम शिवसेना आणि भाजप दोघांचा दावा कायम आहे. अशात अजित पवार गटाला मुंबईत एकही जागा दिल्याचं या फॉर्म्युल्यानुसार दिसत नाहीये.
दक्षिण मुंबईच्या लोकसभा निवडणुकीच्या जागेसाठी मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेकडे जाईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आला. मात्र आताच्या फॉर्म्युल्यानुसार या जागेवर भाजप निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचं कळतं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप छत्तीसगढ मध्यप्रदेशचा फॉर्म्युला अवलंबणार आहे. 2019 ला हरलेल्या 164 जागांची यादी भाजप आधी जाहीर करणार आहेत. याच महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला यादी जाहीर होणार, अशी माहिती आहे. हरलेल्या त्या’ 165 जागांवर भाजपच विशेष लक्ष आहे. या उमेदवारांच्या यादीच 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला ही माहिती दिली आहे.