मुंबई: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुंबईतील एका वृद्ध रिक्षाचालकाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांचे नाव देसराज असे असून ते खारदांडा परिसरात रिक्षा चालवतात. एका संकेतस्थळाने देसराज यांची हदयद्रावक कहाणी जगासमोर आणली. तेव्हापासून सोशल मीडियावर देसराज यांच्या नावाची प्रचंड चर्चा आहे. (Elderly auto driver sells house to fund granddaughter’s education)
देसराज यांची दोन मुलांचे अकाली निधन झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर येऊन पडली. त्यामुळे देसराज यांनाच आपल्या नातवांच्या शिक्षणासाठी पैसे कमवावे लागत आहेत. त्यांची पत्नी आणि नातवंडे गावात राहतात. गावात उपजीविकिचे कोणतेही साधन नसल्यामुळे देसराज यांनी मुंबईत रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
देसराज हे आता वयाच्या पंचाहत्तरीत आहेत. त्यांचा एक पायही अधू आहे. मात्र, या साऱ्या अडचणींवर मात करत देसराज पैसे कमावण्यासाठी जीवाचे अक्षरश: रान करत आहेत.
देसराज यांनी नातवांच्या शिक्षणासाठी मुंबईतील आपले राहते घर विकून टाकले. आता भाड्याचे घर घ्यायला गेले तर महिन्याला दोन-तीन हजार खर्च होतील. मात्र, त्यामुळे आपल्या नातवंडांच्या पालनपोषणासाठी पैसे कमी पडू शकतात, असे देसराज यांना वाटते. हा खर्च टाळण्यासाठी देसराज हे रात्री रिक्षातच झोपतात. त्यानंतर सकाळी सुलभ शौचालयात आंघोळ करुन ते पुन्हा सकाळी आपल्या कामासाठी बाहेर पडतात.
देसराज यांच्या नातवंडाचे सध्या शिक्षण सुरु आहे. त्यांची नात नववीत असताना तिचे वडील गेले. तेव्हा आता मला शाळा सोडावी लागेल का, असा प्रश्न त्यांच्या नातीने विचारला. तेव्हा मी सगळा धीर एकटवला आणि तिला बोललो, नाही, कधीही नाही. तू तुला हवं तेवढं शिक, असे देसराज म्हणाले.
गेल्यावर्षी देसराज यांची नात बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. तिला 80 टक्के मिळाली. ती बातमी ऐकून माझा आनंद गगनात मावत नव्हता, असे देसराज यांनी सांगितले.
देसराज रिक्षा चालवून दिवसाला 700 ते 800 रूपये कमवतात. यापैकी बहुतांश पैसे ते आपल्या गावी नातवंडांसाठी पाठवतात. एखाद्या दिवशी जास्त धंदा झालाच तर मी वरचे पैसे रस्त्यावरील लोकांना देतो, असेही देसराज यांनी सांगितले.
या वयात देसराज यांना इतके काबाडकष्ट करताना पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. मात्र, देसराज यांना या गोष्टीचे कोणतेही वैषम्य वाटत नाही. या वयात कष्ट करण्याचे काहीच वाटत नाही. हा सर्व इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. मी सध्या ज्याप्रकारचे आयुष्य जगत आहे तसे आयुष्य माझ्या नातवांच्या वाट्याला येऊ नये. माझ्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर माझ्याकडे रडत बसण्यासाठी वेळ नव्हता. कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती.
आज मला कोणत्याही गोष्टीचे वैषम्य वाटत नाही. केवळ दोन तरुण मुलांची आठवण आली की मन हळवे होते. एरवी मी रिक्षा चालवतो. अनेक रिक्षाचालक आणि रस्त्यावरील लोक माझ्या ओळखीचे झाले आहेत. त्यांच्याशी माझे कुटुंबाप्रमाणेच नाते आहे. अगदी कोरोनाची साथ शिगेला असतानाही मी रिक्षा चालवत होतो. त्याकाळात मी डॉक्टर, नर्स आणि रुग्णांना रुग्णालयात नेत होतो. या काळात अनेक पोलिसही माझ्या ओळखीचे झाल्याचे देसराज यांनी सांगितले.
देसराज यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा आपले आयुष्य बरेच सोपे झाल्याचे देसराज सांगतात.
(Elderly auto driver sells house to fund granddaughter’s education)