मुंबई | 16 फेब्रुवारी 2024 : व्हॅलेंटाईन डे निमित्त वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. काही कलाकारांच्या पोस्ट प्रचंड व्हायरल झाल्या. कुणी आपल्या प्रिय व्यक्तीसोबतचे फोटो शेअर केले. तर कुणी आपल्या आयुष्यातील खास गोष्ट शेअर करत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. अशातच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अभिनेते किरण माने यांनी व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक पोस्ट शेअक केली. यात त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नात्यावर खास पोस्ट शेअर केलीय. हे दोघे माझ्या नजरेतलं सगळ्यात रोमॅंटिक कपल आहेत, असं किरण माने म्हणालेत.
आज प्रेमाचा दिवस. नितळ प्रेमात जग बदलुन टाकायची ताकद असते, हे दाखवून देणारं माझ्या नजरेतलं सगळ्यात रोमॅंटिक कपल : सावित्रीजोती !
साधारणपणे जोड्या एकत्र येवून संसाराची स्वप्नं रंगवतात. ‘ये तेरा घर ये मेरा घर’ असं गुणगुणत, नविन फ्लॅट घेण्यात आयुष्याचं सार्थक मानतात. पोरापोरींसाठी पै पै जोडण्यासाठी जीवाचं रान करतात. ते झालं की म्हणतात, ‘आमच्या आयुष्याचं चिज झालं’… अर्थात यात वाईट काहीच नाही… पण आपल्या इतिहासातल्या या अनोख्या जोडप्यानं कमावलेली प्राॅपर्टी पहाता आपण यांच्यापुढं किती दरीद्री आहोत याचं भान येतं.
हे दोघं एकत्र आले. एकमेकांना मनापास्नं जीव लावला. काळजाच्या तळापास्नं एकमेकांसाठी जगले ते… साथ दिली पण एवढ्यावरच समाधान नाय मानलं. दोघांनी मिळून जोडीनं एक लैच ‘रोमॅंटिक’ स्वप्न पाहिलं. घर आणि मुलांचं नाही. तर समस्त बहुजनांच्या, शुद्रातिशुद्रांच्या अनेक पिढ्यांचा उद्धार करायचं. त्यांना आईवडीलांनी घरातून हाकललं. घर नव्हतं. मुलबाळ नव्हतं. तरीबी आज असंख्य बहुजनांचे खरे मायबाप हे ‘सावित्रीजोती’ आहेत. आज आपण शिकलेले असू… श्रीमंत असू… ‘वेल सेटल्ड’ असू तर या सगळ्याचं श्रेय जातं ते आपल्या याच आईला आणि बापाला !
‘व्हॅलेंटाईन डे’ हा जगात साजरा केला जाणारा प्रेमाचा उत्सव. प्रेम ही गोष्ट जगात भारी ! पण जगाच्या इतिहासात जे प्रेम अजरामर मानलं गेलंय, ते एकतर काल्पनिक आहे… किंवा कधीच एकत्रच येऊ न शकलेले आहे.. रोमीओ ज्युलिएट पास्नं लैला मजनूपर्यन्त. याउलट, वास्तव जीवनात आयुष्यभरासाठी एकत्र येऊन, आपल्या सहजीवनानं अब्जावधी संसारांना बहर आणणार्या ‘सावित्रीजोती’ यांनी खर्या अर्थानं आपलं ‘प्रेम’ अजरामर केलं… म्हणूनच मी यांना जगातलं एकमेव रोमॅंटिक कपल मानतो.
सगळ्यांना व्हॅलेंटाईन डे च्या रोमॅंटिक शुभेच्छा ! मज्जा करा आज.
– किरण माने.